सिंधुदुर्ग : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरुय. ग्रामपंचायत निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरु आहे. या प्रचारादरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांनी धक्कादायक विधान केलंय. त्यांनी आपल्या वक्तव्यातून मतदारांना थेट धमकीच दिलीय. माझ्या विचारांचा सरपंच निवडून आला नाही तर निधी देणार नाही, असं धक्कादायक विधान नितेश राणे यांनी केलंय. त्यामुळे एकच खळबळ उडालीय. विशेष म्हणजे “तुम्ही धमकी समजा किंवा काहीही समजा, निधी माझ्या हातात आहे, मुख्यमंत्री मला विचारल्याशिवाय निधी देत नाहीत”, असंही नितेश राणे म्हणाले आहेत. त्यांच्या या धमकीमुळे सर्वसामान्यांमध्ये विविध चर्चांना उधाण आलंय.
“चुकनही इथे माझ्या विचाराचा सपरंच निवडून आला नाही तर मी एकही रुपया निधी येणार नाही, एवढी काळजी निश्चितपणे घेईन. आता तुम्ही ही धमकी समजा किंवा काहीही समजा. पण आपलं कॅलक्युलेशन स्पष्ट आहे”, असं नितेश राणे म्हणाले.
“मतदान करताना हे लक्षात घ्या. कारण सगळा निधी माझ्या हातात आहे. जिल्हा नियोजनचा निधी असो, ग्रामविकासचा निधी असो, 25-15 चा निधी असो, केंद्र सरकारचा निधी असो. मी सरकारचा म्हणजे सत्तेत असलेल्या सरकारचा आमदार आहे. पालकमंत्री असो, जिल्हाधिकारी असो, संबंधित कुठलाही मंत्री असो, उपमुख्यमंत्री असो, मुख्यमंत्री असतील, हे कुणीही मला विचारल्याशिवाय नांदगावमध्ये निधी देणार नाहीत”, असं विधान त्यांनी केलं.
“हा विषय तुम्ही स्पष्ट समजून घ्या. नितेश राणेच्या विचाराचा सरपंच आला नाही तर इथे विकास होणार नाही, निधी येणार नाही हे स्पष्ट आहे”, असं नितेश राणे म्हणाले.
दरम्यान, नितेश राणे यांनी कणकवली तालुक्यात भाजपच्या बिनविरोध निवडून आलेल्या सरपंचांचा सत्कार आमदार केला. ओम गणेश निवासस्थानी आमदार नितेश राणेंनी बिनविरोध आलेल्या सात सरपंचांसह 100 सदस्यांचा सत्कार करत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.
उरलेल्या 293 ग्रामपंचायतींमध्ये 250 हून अधिक ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात येतील, असा विश्वास यावेळी राणे यांनी व्यक्त केला. ग्रामपंचायत निवडणुकात विरोधकांना दोन आकडे ही गाठता येणार नाहीत, असा दावा ही त्यांनी व्यक्त केला.