मुंबई | 24 ऑक्टोंबर 2023 : हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ही शिवसेना आपल्या हातांनी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंच्या हाती सोपवली. शिवसेना वाढली बहरली. शिवसेना सत्तावन्न वर्षाचा महावृक्ष झाला. असंख्य शिवसैनिकांच्या घामातून या महावृक्षाला असंख्य फळं लागली. काही फळं गळून गेली, काही फळं पळून गेली. हा वृक्ष छाटण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला. पण, शिवसेना संपली नाही. शिवसेना संपणार नाही. गेली ती फळं, उरलीत ती घट्ट घट्ट शिवसेनेला मजबूत करणारी मूळ अशा शब्दात ठाकरे गटाचे नेते नितीन बानगुडे पाटील यांनी शिंदे गट आणि भाजपवर हल्लाबोल केला.
हे सगळं कशासाठी केलं? यातून कुठला विकास साधला? फक्त जाहिराती, घोषणा आणि आश्वासनांचा सुकाळ, बारी सगळा दुष्काळ अशी टीका करून ते पुढे म्हणाले, ही समोर असणारी अथांग गर्दी सांगतेय. शिवसेना एकच शिवसेना ठाकरेंचीच शिवसेना कडवट, स्वाभिमानी, निष्ठावंत शिवसैनिकांची. सत्तावन्न वर्ष याच शिवतीर्थावरून महाराष्ट्र गर्जत राहिलाय. आम्ही कुणाच्या वाट्याला जात नाही. पण, आमच्याच वाटेवर येऊन कुणी आमच्याशीच वाटमारी करायचा प्रयत्न केला. तर त्याच्या वाटेवर जाऊन त्याची वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्यावर परतत नाही. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे.
वीसपेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करायचा तुघलकी निर्णय घेतला जातो आहे. पण, पटसंख्या कशी वाढवली जाईल यासाठी कुठला अभ्यासगट नेमल्याची नोंद नाही. पण महाराष्ट्रामध्ये बिअरच्या विक्रीमध्ये घट झाली. ही महाराष्ट्रातली बिअर विक्री कशी वाढवावी? यासाठी मात्र महाराष्ट्रात सरकारनं अभ्यास गट नेमलाय. म्हणजे सगळ्या प्रश्नांवर या सरकारनं एकच उत्तर शोधलं आणि करा चीअर. आम्ही कुठं घेऊन चाललो महाराष्ट्र आमचा? ज्या राज्यानं देशाला दिशा दिली त्या राज्याला आम्ही आज कुठल्या दिशेनं घेऊन चाललोय असा सवाल त्यांनी केला.
कोरोनाची महामारी होती. हॉस्पिटल, बेड अपुरे होते. तरी या संकटावर मात करत उद्धवजी ठाकरे यांनी आरोग्य यंत्रणा सोबत घेतली. आरोग्य कर्मचारी बरोबर घेतले आणि या महाभयानक संकटावर मात केली. महाराष्ट्राला सुखरूप बाहेर काढलं. आता कोरोना सारखी महामारी नाही. डॉक्टर तेच आहेत. आरोग्य यंत्रणा तीच आहे. कर्मचारी तेच आहेत. तरी नांदेडच्या शासकीय रुग्णालयामध्ये अठ्ठेचाळीस तासात पस्तीस रुग्ण दगावले. चोवीस तासात बारा रुग्ण दगावले. नागपूरला तेच ठाण्यात तेच हे मृत्यूचं थैमान काय? नेमकं काय बदललंय? बदललं आहे बदललं आहे सरकार अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
उद्धवजी ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरनं घालवलं. पण, कोरोन काळात उद्धवजी ठाकरेंनी केलेलं कार्य जनतेच्या मनातून कसं घालवणार? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. तुम्ही फक्त जाहिराती करा. आज रोज वीस लाख रुपये खर्च आहे जाहिरातीचा. हे जाहिरातीचे पैसे जर औषधाकडं वळवले असते. तर शेकडो निरपराध रुग्ण वाचले असते. आज आमच्या तरुणांची अवस्था काय? बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. परवा पोलीस भरती झाली. सात हजार जागा. अर्ज झाले सहा लाख. तीन शासकीय विभागातल्या भरत्या निघाल्या. जागा होत्या. पस्तीस हजार. अर्ज आले तेवीस लाख. काय अवस्था आहे नेमकी?
यांनी घोषणा करायच्या, आमचे कानखुश, आम्ही मतं द्यायची. त्यांचे कान खुश, पण आपल्या पदरात नेमकं पडलं काय? काय आलं हातात? काय झालं पंधरा लाखाचं? काय झालं दोन हजार बावीसच्या पक्क्या घरांचं? काय झालं दोन करोड नोकऱ्यांचे? काय झालं स्मार्ट सिटीचे? काय झालं आदर्श गावांचं? अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारणार होता? काय झालं त्याचं? इंदू मिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभारणार होता? काय झालं? महागाई कमी करणार होता? काय झालं? शेतकऱ्यांना हमीभाव देणार होता? काय झालं? शेतकऱ्यांचं उत्पादन दुप्पट करणार होता? काय झालं? शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवणार होता? काय झालं? असे अनेक सवाल त्यांनी भाजपला केले.
जनता आता बोलू लागली आहे. तुम्ही रातोरात पक्ष फोडता पहाटे शपथविधी करता. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार राज्यपालाने घेतलेले निर्णय चुकीचे. पक्ष प्रतोदांची निवड चुकीची. गटनेत्यांची निवड चुकीची. तरी हर तऱ्हेने तुम्ही सरकार टिकवता. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण द्यायला तुम्हाला कठीण काय आहे? तुम्ही महाशक्ती आहे ना? तुम्ही म्हंटला होता सत्तेत आलो की एका आठवड्यात धनगरांना आरक्षण देतो. तुम्ही म्हंटला होता सत्तेत आलो की तीन महिन्यात मराठ्यांना आरक्षण देतो. तुम्ही म्हणला होता सत्तेत आला की महिन्यात आदिवासींचे प्रश्न संपवतो. ओबीसींचे प्रश्न संपवतो. काय झालं त्याचं? काय केलं? असे सवालही त्यांनी उपस्थित केले.