‘युद्ध संपलंय, विजय मिळालाय, आता…’, नितीन गडकरी यांचा पुढचा प्लॅन, कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र

| Updated on: Jan 12, 2025 | 5:56 PM

"महाराष्ट्रात शिवशाही निर्माण झाली पाहिजे. ही सर्वांची जबाबदारी आहे. समस्या आहेत, प्रश्न गंभीर आहेत. पण नेतृत्व खंबीर आहे. साईबाबांचा आशीर्वाद आहे. राज्यात शिवशाहीचे सरकार आम्ही राबवू", असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

युद्ध संपलंय, विजय मिळालाय, आता..., नितीन गडकरी यांचा पुढचा प्लॅन, कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
Follow us on

भाजपकडून शिर्डीत राज्यस्तरीय शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील भाजपच्या सर्व प्रमुख नेत्यांनी उपस्थिती लावली. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी भाजपच्या दिग्गज नेत्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी पक्षाचा पुढील प्लॅन सांगत मार्गदर्शन केलं आणि महत्त्वाच्या सूचना देखील केल्या. “राम मंदिर बांधून एक वर्ष पूर्ण झालं, आज राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे आणि स्वामी विवेकानंद यांचंही आज आपण स्मरण करतोय. छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहेत. शिवशाहीचं राज्य स्थापन करण्यासाठी आपल्याला जनतेने निवडून दिलंय. ज्या अपेक्षेने जनतेने यश दिलंय, त्यातून अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी देखील जनतेने दिली आहे. आता युद्ध संपलंय, विजय मिळालाय. निवडणुकीत मिळालेल्या विजयाचे रूपांतरण महाराष्ट्राचे सुराज्य करण्यात करा”, असा कानमंत्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला.

“आमदार, खासदार, मंत्री होतात. पण त्यांना कुणी लक्षात ठेवत नाही. बाबासाहेबांना निवडणुकीत हरवलेल्या उमेदवाराला कुणी ओळखत नाही. पण बाबासाहेबांना विश्वात मानलं जातं. १९८४ मधील पराभवानंतर भाजप संपला असं अनेकांनी म्हटलं. पण अटलबिहारी वाजपेयी यांनी भविष्यवाणी केली होती, सूर्योदय होईल आणि कमळ उमलेल. हा विश्वास अटलबिहारी यांनी व्यक्त केला होता”, असं नितीन गडकरी यांनी सांगितलं. “केवळ काँग्रेसची सत्ता गेली. इतक्यावर भागणार नाही. तुमच्या येण्याने काय झालं? असं जनता विचारेल. आघाडी पेक्षा दहापट अधिक चांगलं काम करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे”, अशी सूचना नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांना केली.

नितीन गडकरींकडून राज्य सरकारचं कौतुक

नितीन गडकरी यांनी गडचिरोलीतील विकासकामे आणि नक्षलवादी समर्पणाचे कौतुक केले. “त्याच गडचिरोलीतील दहा हजार तरुणांच्या हातांना काम देण्याचं काम आपल्या सरकारने केलं. हाच जिल्हा येत्या काळात सर्वाधिक महसूल देणारा जिल्हा असेल”, असं नितीन गडकरी म्हणाले.

हे सुद्धा वाचा

‘प्रश्न गंभीर, पण नेतृत्व खंबीर’

“केवळ स्मार्ट शहरेच नाही तर स्मार्ट गावंही तयार व्हायला हवीत. ग्रामीण भागातील मुले मुंबई, पुणे, नाशिक, नागपुरात नाईलाजाने येतात ही काँग्रेस काळातील परिस्थिती होती. पण ही परिस्थिती आपल्या काळात बदलेल. महाराष्ट्रात शिवशाही निर्माण झाली पाहिजे. ही सर्वांची जबाबदारी आहे. समस्या आहेत, प्रश्न गंभीर आहेत. पण नेतृत्व खंबीर आहे. साईबाबांचा आशीर्वाद आहे. राज्यात शिवशाहीचे सरकार आम्ही राबवू”, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.