कोल्हापूर: काही सडक्या डोक्याच्या लोकांनी स्क्रिप्ट लिहून अपुरी माहिती श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांना पुरवली. यातून संभाजीराजे (sambhaji chhatrapati) आणि शाहू महाराज यांच्यात अंतर असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी केला होता. फडणवीसांच्या या आरोपाचा शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी समाचार घेतला आहे. शाहू महाराजांना कोण चुकीची माहिती देणार? छत्रपती आहेत ते. छत्रपतींचा अपमान करू नका असा. चुकीच्या माहितीवर शाहू महाराज बोलणार नाहीत. फार ज्येष्ठ आहे ते. ज्या घराण्याचा वारसा ते घेऊन जात आहेत. तिथे चुकीच्या माहितीच्या आधारे वक्तव्य केली जात नाहीत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. राऊत हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधत फडणवीसांवर पलटवार केला.
श्रीमंत शाहू छत्रपती यांच्याशी भेट झाली. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा नाही. पाचवी जागा, सहावी जागा विषय नाही. शुभेच्छा आणि आशीर्वाद एवढीच ही भेट मर्यादीत होती. श्रीमंत शाहू महाराज हे शाहूंचे वारसदार आहेत. शिवाजी महाराजांचे वारसदार आहेत. त्यांचे आशीर्वाद घेऊनच आम्ही कामं करतो. कोल्हापुरात आहे, भेटायचंच होतं. मुख्यमंत्र्यांचाही मला निरोप होता, महाराजांना भेटा, त्यांचे आशीर्वाद घ्या. उद्धव ठाकरेंनीही श्रीमंत शाहू महाराजांशी फोनवरून प्रदीर्घ चर्चा केली. त्यांचे आशीर्वाद घेतले. भेटायला येतो म्हणून सांगितलं, असं राऊत यांनी सांगितलं.
श्रीमंत शाहू महाराज यांची भेट घेतल्यानंतर संभाजी छत्रपती यांना राज्यसभेची उमेदवारी देण्याबाबत पुन्हा विचार होणार आहे का? असा सवाल राऊत यांना पत्रकारांनी केला. त्यावर तो विषय संपलेला आहे, असं सांगत या विषयावर अधिक बोलणं राऊत यांनी टाळलं.
दरम्यान, राऊत यांनी सकाळीच शाहू महाराजांना भेटण्यापूर्वी विरोधकांवर टीका केली होती. संभाजी छत्रपती यांना पुढे करून राजकीय उडी मारण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला. पण त्यांची ही उडी फसली आहे. त्यात काही दम राहिला नाही, अशी टीका राऊत यांनी केली होती. दोन जागा शिवसेनेच्या आहेत. तुम्हाला राज्यसभेवर जायचं असेल तर शिवसेनेत या असं आम्ही संभाजीराजेंना सांगितलं होतं, असा पुनरुच्चार राऊत यांनी केला.