गजानन उमाटे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नागपूर | 25 जानेवारी 2024 : मनोज जरांगे यांच्या दबाव तंत्राला ओबीसी समाज उत्तर देणार असं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॅा. बबनराव तायवाडे यांनी म्हटलं आहे. ओबीसी समाजाने देखील मुंबईकडे कूच करण्याची पूर्व तयारी सुरु केली आहे असा इशारा डॉ. तायवाडे यांनी दिला आहे. जरांगे यांच्या दबावाला सरकार बळी पडलं तर ओबीसी समाज पेटून उठेल, असंही त्यांनी म्हटलंय.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मुंबईकडे हळूहळू कूच करत आहेत. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पुणे जिल्ह्यात जोरदार प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता ते लोणावळ्यात दाखल झाले आहेत. हळूहळू ते नवी मुंबईच्या दिशेन येत असून उद्या जरांगे पाटील आणि आंदोलक मुंबईत दाखल होतील. मराठा आरक्षणासाठी उद्यापासून त्यांचे मुंबईत आंदोलन सुरू होणार आहे.
काय म्हणाले डॅा. बबनराव तायवाडे ?
मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळावं अशी त्यांची मागणी आहे. यावर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॅा. बबनराव तायवाडे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
त्यांचा (मराठा आंदोलक) सरकारवर कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न झाला तरी सरकारने ओबीसी समाजाला आणि ओबीसी संघटनांना जो शब्द दिलेला आहे. आम्ही मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहोत परंतु ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावात, ओबीसीमधून आरक्षण देणार नाही, सरकारने ही भूमिका स्पष्ट केलेली होती. सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्रसुद्धा देणार नाही, असंही सरकारने म्हटलं होतं.
आम्हाला दिलेला शब्द सरकार फिरवण्याच्या मानसिकतेत असेल आणि ओबीसीतून मराठा समाजाला हिस्सा देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे, असा आमच्या ज्या दिवशी लक्षात येईल त्या दिवशी या राज्यातील, प्रत्येक गावा-खेड्यातील ओबीसी हा रस्त्यावर उतरेल आणि मुंबईच्या दिशेन कूच करेल, असा इशारा डॉ. तायवाडे यांनी दिला.
जोपर्यंत राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सरकारला सादर करून , सरकार पुन्हा त्यावर विचार करेल आणि त्यानंतर जो निर्णय होईल आणि तो अहवाल विशेष अधिवेशनात ठेवत नाही, तोपर्यंत मराठा आरक्षण शक्य नाही, असं ते म्हणाले.
जरांगे यांनी सरकारवर दबाव तयार करण्यापेक्षा सरकार काय करू शकते व काय करू शकत नाही यांचा विचार करून सरकारला वेळ द्यायला पाहिजे, असंही डॉ. तायवाडे यांनी नमूद केलं.