ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांना धमकीचे फोन आल्याची माहिती समोर येत आहे. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी ओबीसी आरक्षणासाठी नुकतंच आंदोलन केलं. मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण मिळावं, असं मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. मराठा हेच कुणबी आहेत, असं मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. त्यामुळे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावं, अशी मनोज जरांगे यांची मागणी आहे. पण मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र दिलं तर त्याचा ओबीसींच्या आरक्षणावर परिणाम होईल, असं ओबीसी नेत्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण देवू नये, या मागणीसाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी सलग 9 दिवस उपोषण केलं. त्यांच्या उपोषणामुळे सरकारवर दबाव वाढला. त्यामुळे ओबीसी नेत्यांची राज्य सरकारसोबत बैठक पार पडली. या बैठकीत ओबीसींच्या आरक्षणाला धक्का बसणार नाही, असं आश्वासन राज्य सरकारने दिलं. या सर्व घडामोडींनंतर आता लक्ष्मण वाघामारे आणि नवनाथ वाघमारे यांना धमकीचे फोन आल्याची माहिती समोर येत आहे.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांना धमकीचे फोन येत असल्याचं त्यांनी म्हंटलय. नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाके यांच्यावर जालन्यातील वीरा हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान नवनाथ वाघमारे यांच्या फोनवरती अज्ञात व्यक्तीने धमकी दिल्याचा आरोप वाघमारे यांनी केलाय. या धमकीच्या फोननंतर आज वडीगोद्रीतील ग्रामस्थांनी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे.
वडीगोद्रीच्या ग्रामस्थांनी आज पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघामारे यांच्या सुरक्षेची मागणी केली. दुसरीकडे लक्ष्मण हाके यांनी आपण कोणत्याही धमकीला भीक घालत नसल्याचं म्हटलं आहे. यापूर्वी आपल्याला अनेक वेळा धमकीचे फोन आले. आंदोलनादरम्यान आपण फोन उचलले नाहीत. मात्र आपण कोणाला घाबरत नाही, असं वक्तव्य लक्ष्मण हाके यांनी केलं. पोलीस आता धमकी करणाऱ्याला शोधून काढतात का? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.