ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा बीड सरपंच हत्या प्रकरणातील अटकेतील आरोपी वाल्मिक कराड याच्यासोबतचा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोवरुन लक्ष्मण हाके यांना विरोधकांकडून टार्गेट केलं जात आहे. यावर आता लक्ष्मण हाके यांनी खुलासा केला आहे. “मी एक ओबीसी आंदोलक आहे. मी सोलापूर जिल्ह्यातल्या सांगवा तालुक्याचा आहे. मी मराठवाड्यात दोन उपोषण केलेली आहेत. अनेक लोकांचे माझ्यासोबतचे फोटो आहेत. वाल्मिक कराड यांच्यासोबतचा तो फोटो कधीचा आहे? आता तो फोटो पोस्ट करून सनसनाटी निर्माण करायची आहे का? लक्ष्मण हाकेला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे का?”, असा सवाल लक्ष्मण हाके यांनी केला.
“जर या फोटोमुळे मी बदनाम होत असेल तर मग शरदचंद्र पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदय, खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस या सगळ्या मंडळींचे देखल वाल्मिक कराड यांच्यासोबत फोटो आहेत. या सगळ्यांसाठी एक जेल तयार करण्यात यावे. तिथे आम्ही एकमेकांशी संवाद साधू, सोशल जस्टीस म्हणजे काय, रिझर्वेशन म्हणजे काय. त्यांना किती मूल्य असते यावर विचार विनिमय करू, अशा घटनांचं राजकारण करू नये. याबाबत आम्हाला विचार विनिमय करायला वेळ तिथे भेटेल”, असं लक्ष्मण हाके म्हणाले.
यावेळी लक्ष्मण हाके यांना मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्याबाबतही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी प्रत्युत्तर दिलं. “आम्ही वाट बघत आहोत, ते दुसरं काय बोलू शकतात, त्यांना दुसरं काय येते. त्यांना इथला कायदा, कानून आणि संविधान मान्य आहे का? ते 2200 वर्ष पूर्वीसारखं वागत आहेत. इकडून तिकडून येऊन घुसून मारू, या प्रश्नाची उत्तरे त्यांनाच विचारायला पाहिजे. आम्ही कुठे या घटनेत आरक्षणाबद्दल बोललो? आम्ही म्हणतो संतोष देशमुख यांच्या संवेदनशील विषयात तुम्ही देखील राजकारण आणू नका. ही आमची प्रत्येक वेळी मागणी आहे”, असं लक्ष्मण हाके म्हणाले.
“सीआयडी आणि न्यायव्यवस्थेला फ्री अँड फेअर काम करू द्या ना. दबाव टाकून हा अधिकारी नको, हा अधिकारी नाही पाहिजे. एका विघ्ने नामक अधिकाऱ्याला त्यांनी सीआयडीमधून काढलं असेल, तर आम्ही दुसऱ्या अधिकाऱ्यांच्या जाती काढायच्या का? आम्ही असं म्हणायचं का की या अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली आम्हाला न्याय मिळणार नाही, हे असं चालेल का? जातीच्या चष्म्यातून ते लोक पाहत आहेत, असं होऊ नये आमचं म्हणणं आहे”, अशी भूमिका हाके यांनी मांडली.
“आम्ही कुठला लाभ घेतला, सामाजिक न्यायचा लाभ होत असेल तर आम्ही का करू नये? मी सामाजिक न्यायाचं बोलतोय. त्यांना ते कळतंय का पाहा. जरांगे काय बोलतात हे त्यांनाच माहीत. मग तुम्ही कुठले लाभार्थी आहात, वर्ष झालंय तुम्ही महाराष्ट्राला वेठीस धरलंय. मग तुम्ही कोणाची लाभार्थी आहात? तुम्हाला कोणी कोणी लाभ पोहोचवलाय, त्यांना कोणता लाभ अपेक्षित आहे? आधी हे विचारा”, असं लक्ष्मण हाके म्हणाले.