जालना : राज्यात ओबीसी आणि मराठा असा वाद निर्माण झाला आहे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नये या मागणीसाठी वडीगोद्रीत उपोषणाला बसलेले ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. धमकी देणाऱ्याने तुला जिवंत राहायचं की नाही असे म्हणत धमकी देण्यात आली आहे. यावेळी माझा फोन माझ्या सहकाऱ्याकडे होता. परंतू मीच बोलतोय समजून धमकी देण्यात आल्याचे वाघमारे यांनी म्हटले आहे.
नवनाथ वाघमारे हे देखील ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांच्या सोबत वडीगोद्रीत उपोषणाला बसले होते. दहा दिवस उपोषण झाल्यानंतर सगेसोयरे अध्यादेशाची लागलीच अंमलबजावणी केली जाणार नाही असे आश्वसान सरकारच्या शिष्ठमंडळाने त्यांना दिले. त्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांच्या मध्यस्थीने या दोघा ओबीसी नेत्यांनी उपोषण मागे घेतले. आपण स्वत:हून पोलिस संरक्षण मागणार नाही जर पोलिसांना काळजी असेल तर ते देतील संरक्षण असेही नवनाथ वाघमारे यांनी म्हटले आहे.
आपल्याला झुंडशाही आणि जातीयवादी लोकांकडून अनेक वर्षापासून धमक्यांना येत आहेत. मात्र मी धमक्यांना घाबरत नाही असेही नवनाथ वाघमारे यांनी म्हटले आहे. यासंदर्भात वडीगोद्री येथील ओबीसी समर्थकांनी जालन्याच्या पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे. पोलीस प्रशासनाने सुरक्षा दिली तर आपण ती स्विकारु असेही वाघमारे यांनी म्हटले आहे.
ओबीसी आणि मराठा समाजात तेड निर्माण झाली असतानाच आता मराठा आंदोलकांनी संभाजीनगरात सोमवारी डॉ. रमेश तारख यांच्या तोंडाला काळे फासल्याची घटना घडली होती. डॉ. रमेश तारख यांनी आंतरवाली सराटीतील मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणाला विरोध केल्याच्या आरोपावरुन तारख यांना काळे फासण्यात आले होते. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवेदन करण्याचा हक्क आहे. एखाद्या व्यक्तीला काळे ही झुंडशाही आहे. इथे कायद्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. शाळा, मजूर आणि इतर लोकांना त्रास होत असेल म्हणून त्यांनी विरोध केला असेल. त्यांच्यासोबत ग्रामपंचायत सदस्य देखील होते. अशा प्रकारे तोंडाला काळे फासून दबाव आणणे हे बेकायदेशीर असल्याची प्रतिक्रीया ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे.
कोणतेही आंदोलन कायदेशीर आणि रितसर व्हावे. लोकांना त्याचा त्रास झाला नाही पाहिजे. एका उच्छाशिक्षित माणसाच्या तोंडाला काळं फासणे योग्य नाही. गृह विभागाने यात लक्ष घालावे. उद्या काहीही होऊ शकेल. जरांगे काय मागणी करतात हे आतापर्यंत कळलेच नाही. ज्या गोष्टी मान्य होत नाहीत त्याच मागण्या ते करीत आहेत. त्या पूर्णपणे राजकीय आहेत. त्यांच्या पाठीमागे पूर्णपणे राजकीय षडयंत्र आहे. ते कोणाचा प्रचार करतात हे जनतेला माहीत असेही प्रा. लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे यांनी आपण धमाका करणार आहे असे म्हटले आहे. त्यावर तो धमाका काय होते ते बघुयात, पण धमाका बेकायदेशीर नसावा असे त्यांनी म्हटले आहे. त्यांचे नेहमीच फुगा फुटावा असे होत आहे. आतापर्यंत आपण विनोद पाटील यांना अभ्यासू समजत होतो. मात्र विनोद पाटील यांनी मी धनगर आहे आणि ओबीसीबद्दल आंदोलन करतो असा माझ्यावर आरोप केला आहे. परंतू धनगर समाज ओबीसी मध्ये नाहीत का ? लोकांचा बुद्धिभेद करू नका ? जरांगे यांचा काडीचाही अभ्यास नाही. ओबीसींचे आरक्षण वाचले पाहिजे यासाठी आम्ही सर्व जण एक आहोत असेही लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे.
आरक्षण हे मागासवर्गीयांसाठी आहे. मराठा मागास असेल तर पुढे कोण गेला आहे ? महाराष्ट्र सरकारने इंपिरियल डाटा पुढे आणावा. मराठा समाजाच्या पुढे लोहार, कुंभार, माळी कोण पुढे गेला आहे ? परंतू इम्पिरियल डाटापासून सरकार पळ काढत आहे. जरांगे यांनी तरुणांची दिशाभूल करु नये. मराठा समाजाच्या तरुणांची उन्नती करायची असेल तर सरकारकडे अनेक योजना आहेत. खासगीकरण आणि उदात्तीकरण यामध्ये सरकारी नोकऱ्या कुठे राहिले आहेत हे जरांगे यांनी सांगावे ?