सांगली लोकसभा मतदार संघातील निवडणुकीतील ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार प्रकाश अण्णा शेंडगे यांना धमकी देण्यात आली आहे. त्यांच्या गाडीला अज्ञातांकडून चप्पलचा हार घालण्यात आला. गाडीवर शाई फेकत धमकीचे पत्रक लावण्यात आले आहे. त्यात लोकसभा निवडणुकीत छगन भुजबळ यांनी माघार घेतली तू ही माघार घे, मराठ्यांच्या नांदी लागू नको, अन्यथा…अशी धमकी दिली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
सांगली लोकसभा मतदार संघात ओबीसी बहुजन पार्टीकडून प्रकाश अण्णा शेंडगे उमेदवार आहेत. त्यांच्या गाडीला अज्ञातांकडून चप्पलांचा हार घालण्यात आल्याचा प्रकार रविवारी उघड झाला. तसेच त्या गाडीवर शाही फेकण्यात आली आहे. गाडीच्या बोनेटवर काळी शाई फेकत पुढे चप्पलचा हार घातला. त्यावेळी एक पत्रक लावण्यात आले. त्यात धमकी दिली आहे. हॉटेल ग्रेट मराठासमोर त्यांची गाडी उभी असताना शनिवारी रात्री अज्ञातांकडून हा प्रकार करण्यात आला आहे.
प्रकाश शेंडगे यांच्या गाडीच्या काचेवर धमकी वजा इशारा देण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे की, प्रकाश शेंडगे तुला मराठा समाज पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही. भुजबळाने जशी नाशिक लोकसभा मतदार संघामध्ये माघार घेतली. तशी तू माघार घे आणि मराठ्यांच्या नादी लागू नका नाही तर तुला महाराष्ट्रात फिरू देणार नाही. मराठ्याला विरोध केला तर पुढच्या वेळी चपलेला हार गळ्यात घालू.. एक मराठा लाख मराठा असे पत्रकावर लिहिले आहे. हे पत्रक गाडीच्या काचेवर चिकटवले आहे.
दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी या प्रकाराचा निषेध केला आहे. हे मराठ्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. मराठे असे प्रकार करणार नाहीत. प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. काही जण असे आहेत की ते स्वतः करतात आणि मराठ्यांवर नाव घालत आहेत, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
सांगली लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्या कार्यकर्त्यांना दमदाटी व शिवीगाळ करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातल्या खरशिंग गावात मराठा समाजातल्या तरुणांकडून ही दमदाटी व शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप ओबीसी नेते व सांगली लोकसभेचे उमेदवार प्रकाश शेंडगे यांनी केला आहे.
ओबीसी बहुजन पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून आपल्या निवडणुकीचा प्रचार सुरू असताना खरशिंग गावामध्ये मराठा समाजातल्या कार्यकर्त्यांकडून गावात प्रचार साहित्य वाटू देण्यात आले नाही. तसेच आपणाला आणि छगन भुजबळ यांना मराठा आरक्षणाला विरोध केल्याच्या भावनेतून शिवीगाळ देखील केल्याचा आरोप देखील प्रकाश शेंडगे यांनी केला आहे. दरम्यान या घटने प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात येणार असल्याचा प्रकाश शेंडगे यांनी स्पष्ट केले आहे.