ओबीसीतूनच मराठा आरक्षण घेणार, असं जरांगे पुन्हा एकदा म्हणत आहेत. तर ओबीसी आरक्षण शाबूत ठेवणार असं लिखीत द्या अशी मागणी लक्ष्मण हाके यांची आहे. त्यासाठी हाके यांचं 6 दिवसांपासून उपोषण सुरु आहे. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी काही ओबीसी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत आणि जाळपोळही झाली. सगेसोयऱ्यांसह नोंदींवरुन मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, अशी मागणी जरांगेंची आहे. तर ओबीसी आरक्षणाला धक्का नको, या मागणीसाठी लक्ष्मण हाके उपोषणाला बसलेत.
लक्ष्मण हाके यांच्या उपोषणावरुन आता जालन्यात ओबीसी संघटना आक्रमक झाल्या आहेत. हाकेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी धुळे-जालना हाय वेवर रास्ता रोको केला गेला. टायर जाळून सरकारला थेट इशारा देण्यात आलाय. रस्ता रोको आंदोलनाला हिंसक वळण लागताच पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतलं.
प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे 6 दिवसांपासून जालन्याच्या वडीग्रोदी गावात उपोषणाला बसलेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी ओबीसी संघटना आता रस्त्यावर उतरल्यात. ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागत नाही, हे सरकारनं लिखीत द्यावं अशी मागणी लक्ष्मण हाकेंची आहे. त्यासाठी त्यांनी ओबीसींना एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं आणि संध्याकाळी ओबीसी संघटना आक्रमक झाल्या.
ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी लढत असल्याचं हाकेंचं म्हणणं आहे. तर आरक्षण ओबीसीतूनच घेणार, असं पुन्हा जरांगेही म्हणाले आहेत. लक्ष्मण हाकेंनी आता, जरांगेंवर थेट बोलणं सुरु केलंय. फोडा आणि झोडा ही इंग्रजांची रणनीती जरांगेंची असल्याचं हाके म्हणाले आहेत.
हाकेंच्या उपोषणाला, सरकारकडून मंत्री अतुल सावेंनी भेट दिली. त्यानंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे ओबीसी नेते हाकेंच्या उपोषण स्थळी आले. ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरैंनीही हाकेंची भेट घेतली तर मंत्री भुजबळही हाकेंच्या उपोषणस्थळाला भेट देणार असल्याची माहिती आहे. जरांगेंच्या मागणीला सर्वात आधी विरोध करणारे भुजबळच पहिले ओबीसी नेते आहेत.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणार नाही, असं लिखीत दिल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, अशी भूमिका लक्ष्मण हाके यांची आहे. अद्याप लिखीत आश्वासनावर सरकारनं स्पष्टपणे आपली भूमिका घेतलेली नाही.