महाराष्ट्रात आरक्षणाचा विषय गंभीर बनला आहे. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण द्याव या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. पण यामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागण्याची भिती आहे. त्यामुळे जालन्याच्या वडीगोद्रीमध्ये प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा 10 वा दिवस आहे. त्यांनी उपोषण मागे घ्यावं, या मागणीसाठी सरकारच शिष्टमंडळ त्यांच्या भेटीसाठी तिथे गेलं आहे. यावेळी नवनाथ वाघमारे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर त्यांनी भाष्य केलं.
“मराठवाड्यातील तसेच महाराष्ट्रातील ओबीसी बांधवांना मी धन्यवाद देतो. गेल्या 10 दिवसांपासून मी आणि हाके सर उपोषणाला बसलो होतो. दरदिवशी उपोषणाला वाढता पाठिंबा मिळत होता. त्यामुळे उपोषण करायला ताकद आणि ऊर्जा मिळाली. गेल्या सात-आठ महिन्यात मराठवाड्याने काय भोगलं? मराठवाड्यातील ओबीसी कार्यकर्त्यांनी काय भोगलं हे सर्वाना माहित आहे. हा समाज एकत्र येण्याच, पेटून उठण्याच कारण आहे” असं नवनाथ वाघमारे म्हणाले.
‘अती झाल्यानंतर माती व्हायला सुरुवात होते’
“आपल्यापेक्षा आपल्या देशाचे नेते, श्रद्धास्थान, आधरस्तंभ भुजबळ साहेबांना काय त्रास झाला? भुजबळ साहेबांवर काय कमेंटस केल्या? त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण पाहिलं. कुठल्याही गोष्टीचा टायमिंग असतो. कुठली गोष्ट अती झाल्यानंतर माती व्हायला सुरुवात होते. ओबीसी नेत्यांना टार्गेट करण्याच काम यांनी केलं. आपल्या लोकनेत्या पंकजाताई साहेब या कुठल्याही मोर्च्याला आल्या नव्हत्या, कुठल्याही मेळाव्यात आल्या नाही, तरी यांनी जातीयवाद करुन टार्गेट करुन पाडण्याच काम केलं. गोपीनाथ मुंडे साहेबांनी कुणाची जात न पाहता आमदार-खासदार घडवले” असं नवनाथ वाघमारे म्हणाले.
‘इंडिया आघाडीच्या विजयाच श्रेय मुस्लिम, दलित बांधवांना’
“इंडिया आघाडीच्या विजयाच श्रेय मुस्लिम, दलित बांधवांना जातं. कारण भाजपा संविधान विरोधात आहे, मुस्लिम विरोधी आहे असा प्रचार करण्यात आला. त्याचा भाजपाला फटका बसला. कोणीतरी याच श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांना श्रेय देऊ नये” असं नवनाथ वाघमारे म्हणाले.
‘शासन सर्वांचं असतं, ते कुणा एकाचं नसतं’ – धनंजय मुंडे
“काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली. आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने जेवढे विषय मांडले तेवढे शासनाने गंभीरपणे घेतले आहेत. या विषयाबाबत शासनाची भूमिका अधिकारवाणीने भुजबळ मांडतील. ही नक्कीच आपल्या सर्वांच्या भावनेशी संबंधित गोष्ट आहे. 8 महिन्यापूर्वी असं वातावरण नव्हतं. आपण सर्व गुण्यागोविंदाने राहत होतो. गावात सर्व एकत्र राहत होते. पण नऊ महिन्यापासून संबंध महाराष्ट्रात ओबीसींच्या मनात शासनाने घेतलेल्या भूमिकेने एका सामाजासाठी जी भूमिका घेतली. त्यामुळे ओबसींमध्ये एक समज निर्माण झालं. त्याचा हा परिपाक आहे. शासन सर्वांचं असतं. ते कुणा एकाचं नसतं. शासन कुणावर अन्याय करत नाही. हा समज योग्य आहे की नाही हा ओबीसींमध्ये संभ्रम झाला होता. तुमच्या भावनांचा सन्मान केला. त्यामुळे आज आम्ही आलो. त्यापूर्वी तीन मंत्रीही येऊन गेले. आज सरकारच्यावतीने भुजबळ, गुलाबराव पाटील, गिरीश महाजन, अतुल सावे, उदय सामंत यांच्या नेतृत्वात आम्ही शासनाची भूमिका मांडायला आलो आहे. ओबीसी आरक्षणाबाबत सरकार काय करणार हे भुजबळ सांगणार आहेत”