भाजपला अडचणीत आणणारा मुद्दा मविआला सापडला, निवडणुकांमध्ये कोण कुणाला घेरणार?

| Updated on: Feb 03, 2023 | 11:55 PM

जुन्या पेन्शनचा मुद्दा भाजपला आव्हान देतोय. कारण शिक्षक आणि पदवीधरच्या निवडणुकीतून कर्मचारी आणि पदवीधरांनी आपला रोष व्यक्त केला. त्यामुळं आगामी निवडणुका पाहता भाजपसमोर अनेक आव्हानं आहेत.

भाजपला अडचणीत आणणारा मुद्दा मविआला सापडला, निवडणुकांमध्ये कोण कुणाला घेरणार?
Follow us on

मुंबई : शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत जुन्या पेन्शन योजनेवरुन (Pension Scheme) कसा फटका बसला, हे भाजपच्या नेत्यांनी मान्य केलंय. शिक्षक आणि पदवीधरच्या निवडणुकीत जुन्या पेन्शन योजनेसाठी आग्रही असलेल्या कर्मचाऱ्यांनी भाजपवर आपला राग व्यक्त केला. 5 ठिकाणी झालेल्या निवडणुकीत भाजपचा 3 ठिकाणी पराभव झाला. नागपूरच्या शिक्षक मतदारसंघात काँग्रेसच्या सुधाकर आडबालेंचा विजय झाला. तर भाजप समर्थित ना.गो.गाणार यांचा पराभव झाला. अमरावती पदवीधरच्या निवडणुकीत काँग्रेसच्या धीरज लिंगाडे विजय झाला आणि भाजपच्या रणजित पाटलांचा पराभव झाला. औरंगाबादच्या शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीचे विक्रम काळे विजयी झालेत. तर भाजपच्या किरण पाटलांचा पराभव झाला.

जुनी पेन्शन योजना लागू होणार नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आधी विधानसभेत म्हणाले. नंतर औरंगाबादेत त्यांनी आमच्यातच धमक असल्याचंही म्हटलंय. मात्र ठोस शब्द न मिळाल्यानं कर्मचाऱ्यांनी आणि पदवीधरांनी भाजपच्या विरोधात मतदान केलं.

जुनी पेन्शन योजना हा विषय फक्त याच निवडणुकीत गाजला असं नाही. तर भाजपसाठी आगामी निवडणुकांसंदर्भात मोठा अलर्ट आहे.

हे सुद्धा वाचा

मुंबई, ठाणे आणि पुणेसह 24 महापालिका निवडणुका होणार आहेत. 200 हून अधिक नगरपरिषदा आणि नगर पंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. जिल्हा परिषदेच्याही निवडणुका होणार आहेत. पुढच्या वर्षीच लोकसभा आणि नंतर विधानसभेच्याही निवडणुका आहेत.

भाजपसमोर मोठं आव्हान

या निवडणुकांमध्ये भाजपसमोर मोठी आव्हानं उभी असणार आहेत. जुनी पेन्शन योजना हा ज्वलंत विषय आहे. महाविकास आघाडीचं मोठं आव्हान भाजपसमोर असेल. 3 पक्ष एकत्र लढल्यास भाजपच्या पराभवाची शक्यता वाढते हे 5 ठिकाणच्या निवडणुकांमधून दिसलं

5 पैकी 3 ठिकाणाचा विजय मविआला बुस्ट देणारा आहे. त्यामुळं भाजपला आता आगामी निवडणुकांसाठी नवी रणनीती तयार करावी लागेल. कारण महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष एकत्रच लढणार हे संजय राऊत, अजित पवार आणि पटोलेंनीही स्पष्ट केलंय.

भाजपसमोर आव्हानांचा डोंगर

शिक्षक आणि पदवीधरच्या निवडणुकीतून जे निकाल समोर आलेत. त्यामुळं भाजपचं टेंशन तर वाढलंच आहे. कारण नागपुरात फडणवीसांच्या होम पिचवरच भाजपचा पराभव झाला, इथं भाजप समर्थित ना. गो. गाणारांचा पराभव झाला.

अमरावतीत फडणवीसांचेच खास विद्यमान आमदार रणजित पाटलांचा पराभव झाला. औरंगाबादच्या शिक्षक मतदारसंघातही किरण पाटलांचा पराभव झाला. त्यामुळं आगामी निवडणुकांसाठी सुशिक्षितांनी भाजपला सावध केलंय.

जुन्या पेन्शन योजनेवर भाजपला आपली भूमिका ठरवावीच लागेल. कारण विजयी झालेले उमेदवारही जुन्या पेन्शन योजनेसाठी लढा सुरुच ठेवणार आहेत आणि भाजपचे पराभूत उमेदवारही जुन्या पेन्शन योजनेच्या मुद्द्याचा फटका बसल्याचं मान्य करतायत.

एकीकडे 3 पक्षांची महाविकास आघाडी आणि दुसरीकडे पेन्शनचा ज्वलंत मुद्दा आणि समोर आगामी निवडणुका, त्यामुळं भाजपसमोर आव्हानाचं डोंगर आहे.