जालनाः कोरोनाने मराठवाड्यातही आपले पाय रोवायला सुरुवात केल्यामुळे सर्वच जिल्ह्यात खबरदारी घेतली जात आहे. जालन्यात परदेशातून येणाऱ्या नागरिकांवर करडी नजर ठेवली जात आहे. आतापर्यंत शहरात 61 जण विदेशातून आले असून त्यापैकी 16 जण अजूनही नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे.
ओमिक्रॉन आजाराच्या पार्श्वभूमीवर परदेशातून आलेल्या प्रवाशांचे स्क्रीनिंग करण्यासह त्यांची आरटीपीसीआर चाचणी घेतली जात आहे. त्यानंतर त्यांना सात दिवस अलगीकरणात ठेवले जाते. गेल्या पंधरा दिवसात जालन्यात आलेल्या 61 पैकी 16 जणांशी मात्र अद्याप संपर्क झाला नाही, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी दिली आहे. हेच लोक शहरात किंवा जिल्ह्यात खुलेआम फिरत असल्यास आणि त्यापैकी एखाद्याला कोरोना किंवा ओमिक्रॉनची बाधा असल्यास त्याचा संसर्ग इतरांना होऊ शकतो, अशी भीती जिल्हा प्रशासनाला वाटत आहे.
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जालन्यात संशयित आढळून येणाऱ्या रुग्णांच्या लाळेचे नमूने जालन्यातून दर पंधरा दिवसाला पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवले जातात. सुदैवाने आतापर्यंत पाठवण्यात आलेल्या एकाही नमून्याचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले नाहीत. ओमिक्रॉनने जालन्याचा शेजारील बुलडाणा आणि लातूर जिल्ह्यातही शिरकाव केल्याने जिल्ह्यात जास्त खबरदारी घेतली जात आहे.
इतर बातम्या-