मुंबई : कोरोना विषाणूचा नवा प्रकार (Corona New Variant) असलेल्या ओमिक्रॉननं (Omicron) राज्यात शिरकाव केलाय. डोंबिवली, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि आता मुंबईतही ओमिक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग (Health Department) आणि संबंधित यंत्रणांकडून मोठी खबरदारी घेतली जात असल्याचं पाहायला मिळत आहे. परदेशातून आलेल्या प्रवाशांना आणि त्यांच्याशी संपर्कात आलेल्या लोकांना ओमिक्रॉनची लागण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता हायरिस्क देशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी मुंबई विमानतळावर वेगळा कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे.
हायरिस्क देशातून आलेली सर्व विमाने टर्मिनलच्या पूर्वेला उतरवण्यात येतील. प्रवाशाने विमानतळावर प्रवेश करताच थर्मल स्कॅनरमधून तापमान मोजले जाईल. त्यानंतर आरटीपीसीआर टेस्ट करण्यासाठी 100 रजिस्ट्रेशन काऊंटर तयार करण्यात आले आहेत. प्रवाशांना कोरोना चाचणीसाठी ताटकळत राहावे लागू नये म्हणून 68 सॅम्पल कलेक्शन बुथ तयार करण्यात आले आहेत. आरटीपीसीआर आणि रॅपीड पीसीआर हे दोन पर्याय प्रवाशांकडे असतील. सॅम्पल कलेक्शननंतर प्रवाशी इमिग्रेशन प्रक्रिया पार पाडू शकतो. दरम्यान, प्रवाशाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यास त्याला 14 दिवस संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येईल. तर रिपोर्ट निगेटीव्ह आल्यास 7 दिवस होम कॉरंटाईन केले जाईल. 7 दिवसानंतर या प्रवाशाची पुन्हा तपासणी केली जाणार आहे.
दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गवरुन 25 नोव्हेंबर 2021 रोजी मुंबईत आलेल्या 37 वर्षीय पुरुषाला ओमिक्रॉन विषाणूची बाधा झाल्याचे सिध्द झाले आहे. या रुग्णासोबत राहिलेल्या आणि 25 नोव्हेंबरला अमेरिकेहून आलेल्या त्याच्या 36 वर्षीय मैत्रिणीला देखील या विषाणूची बाधा झाल्याचे प्रयोगशाळा अहवालातून समोर आले आहे. दरम्यान, या दोघांना कोणतीही लक्षणे नाहीत. हे दोन्ही रुग्ण सेव्हन हिल्स रुग्णालयात भरती आहेत. या दोन्ही रुग्णांनी फायझर लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. या दोन्ही रुग्णांच्या 5 अतिजोखमीच्या आणि 15 कमी जोखमीच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात आलेला आहे. पुढील तपास सुरु आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी कोरोनाच्या नव्या रुपाच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर कोणत्या उपाययोजना केल्या आहेत, याची माहिती दिलीय. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार विमानतळावर उतरलेल्या प्रवाशांना संस्थात्मक अलगीकरण सक्तीचे करण्यात येणार आहे. या प्रवाशांचे कोणत्याही परिस्थितीत गृह अलगीकरण करण्यात येणार नाही. दुर्दैवाने कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा रुग्ण आढळून आलाच तर त्याच्यावर कोरोना उपचार केंद्रामध्ये स्वतंत्रपणे उपचार करण्यात येतील.
इतर बातम्या :