नाशिकः कोरोना रुग्णांचा होणारा गुणाकार आणि ओमिक्रॉनची धास्ती पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या सोमवारपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू करणार असल्याची घोषणा केली. त्याची नाशिक जिल्ह्यात जोरदार तयारी करण्यात आली आहे. नाशिक शहरामध्ये सहा ठिकाणी आणि जिल्ह्यात एकूण 39 लसीकरण केंद्रांवर या मुलांचे लसीकरण केले जाणार आहे. त्यासाठी शाळा आणि महावद्यालयाची मदत घेतली जाणार आहे.
साडेतीन लाख मुलांचे लसीकरण
अतिशय महत्त्वकांक्षी असणाऱ्या या मोहिमेत जिल्ह्यामध्ये साडेतीन मुलांना कोव्हॅक्सिन लस देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्प्यात ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये आणि जिल्हा रुग्णांलयांमध्ये ही लस देण्यात येणार आहे. या केंद्रांवर प्रतिसाद वाढल्यानंतर इतर ठिकाणी केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा मार्च महिन्यात आहे. या विद्यार्थ्यांची परीक्षा यंदा ऑफलाईन होण्याची शक्यता आहे. सरकारने तशी तयारी केली आहे. त्यामुळे पहिल्यांदा या विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार असल्याचे समजते.
शहरात 11 केंद्रे
लहान मुलांच्या लसीकरणात शहरी भागात 11 केंद्रे ठेवण्यात आली आहेत. त्यात नाशिक महापालिका हद्दीत 6 आणि मालेगाव महापालिका हद्दीत 5 केंद्रे असणार आहेत. तर 29 केंद्र हे ग्रामीण भागात असणार आहेत. गरज पडल्यास प्रत्येक महाविद्यालयातही लसीकरण करण्यात येणार आहे. नाशिकमध्ये इंदिरा गांधी रुग्णालय, सातपूर ईएसआय हॉस्पिटल, सिडको समाज कल्याण कार्यालय, नवीन बिटको हॉस्पिटल आणि झाकीर हुसैन हॉस्पिटल या केंद्रावर ही मोहीम सुरू करण्यात येणार आहे. या ठिकाणी सकाळी सकाळी दहा ते दुपारी चारपर्यंत लसीकरण सुरू असेल. प्रत्येक केंद्रावर 500 डोस उपलब्ध असणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.
नियमांचे पालन नाही
नाशिक जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक नियमांचे कुठेही पालन केले जात नाही. बहुतांश जण मास्क वापरत नाहीत. ओझरमध्ये सत्ताधारी शिवसेनेच्या माजी आमदाराने बैलगाडा शर्यत घेऊन हजारो लोकांची गर्दी जमा केली. यावेळी कुणाच्याही चेहऱ्यावर मास्क नव्हते. प्रशासनाच्या नाकावर टिच्चून ही शर्यत पार पाडली. तोच कित्ता गिरवत दिंडोरी तालुक्यातील लाखमापूर येथेही हजारो जणांची गर्दी जमवून बैलगाडा शर्यत पार पडली. याप्रकरणी संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, हा गाफीलपणा येणाऱ्या काळात भोवणार आहे.
Good news| नाशिक-शिर्डी अवघ्या दीड तासात; सिन्नर चौपदरी महामार्ग मार्चअखेर होणार खुला