मुंबई : कोरोनाचा नवीन प्रकार (Corona New Variant) असलेल्या ओमिक्रॉनच्या (Omicron) फैलाव राज्यात वाढताना पाहायला मिळत आहे. डोंबिवली, पुणे, पिंपरी-चिंचवडनंतर (Pimpri-Chinchwad) आता मुंबईतही ओमिक्रॉनची लागण झालेले दोन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील ओमिक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता 10 वर पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार खबरदारीचे उपाय म्हणून निर्बंध कडक करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशावेळी आज टास्क फोर्सची महत्वाची बैठक बोलावण्यात आली आहे.
ओमिक्रॉनचा धोका वाढत असल्यामुळे टास्क फोर्सची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत टास्क फोर्समधील प्रमुख डॉक्टर सहभागी झाले आहेत. दक्षिण आफ्रिकेतील एक तज्ज्ञ महिला डॉक्टरही या बैठकीला ऑनलाईन पद्धतीने उपस्थित असल्याचं कळतंय. टास्क फोर्समधील डॉक्टर ओमिक्रॉनबाबत अधिकची माहिती या दक्षिण आफ्रिकेतील डॉक्टरकडून जाणून घेणार आहेत. ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होत आहे. तसंच राज्यातील आणि देशातील ओमिक्रॉनच्या शिरकावानंतर सर्व परिस्थितीचा आढावा या बैठकीत घेतला जात आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये सहा तर पुण्यात एकाला ओमिक्रॉनची लागण झाल्याचं रविवारी सायंकाळी स्पष्ट झालं. राज्यातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या 8 झाली आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग सुरू होताचं पुणे महापालिका पुन्हा एकदा ॲक्शन मोडमध्ये आली आहे. पालिकेच्या आरोग्य विभागानं सीओईपीच्या मैदानावरील जम्बो रुग्णालयाची पाहणी करत रुग्णालय कार्यरत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, जम्बो रुग्णालय 1 जानेवारीपर्यंत न हलवण्याच्या सूचना अजित पवारांनी बैठकीत दिल्या होत्या. महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. पवार यांनी काल पाहणी करून रुग्णालय रेडी पझेशनमध्ये ठेवण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. जम्बो रुग्णालयात एकुण 800 बेडची व्यवस्था आहे.
फक्त 96 तासात देशातल्या 5 राज्यांत ओमिक्रॉन पसरलाय. 2 डिसेंबरला कर्नाटकात 2 ओमिक्रॉन बाधित निघाले. नंतर 4 तारखेला गुजरातच्या जामनगरमध्ये एक रुग्ण, 4 तारखेच्या संध्याकाळी कल्याण-डोंबिवलीत एक रुग्ण, आणि यानंतर दिल्लीत एक व्यक्ती ओमिक्रॉन बाधित आलाय. यापैकी कल्याण-डोंबिवलीतला जो ३३ वर्षीय तरुण बाधित झालाय, त्याला फक्त हलका ताप आहे. इतर कोणतीही लक्षणं नाहीत. तो काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आला होता. सध्या त्याला कल्याणच्या कोव्हिड सेंटरमध्ये भर्ती करण्यात आलंय. मात्र त्यानं अद्याप कोरोनाची एकही लस घेतलेली नाही. कोरोनाचा एकही डोस न घेता या तरुणानं दक्षिण आफ्रिकेतून भारताचा प्रवास कसा केला, याबद्दलही आश्चर्य व्यक्त होतंय. दरम्यान, या तरुणाच्या संपर्कात आलेल्या 34 लोकांच्या चाचण्या झाल्या आहेत. त्या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
इतर बातम्या :