उमेश पारीक, लासलगाव, नाशिक | 17 नोव्हेंबर 2023 : कधी ग्राहकांना तर कधी शेतकऱ्यांना रडवणारे पीक म्हणजे कांदा आणि टोमॅटो. आता कांदा आणि टोमॅटो पुन्हा रडवणार आहे. कांदा पिकामुळे शेतकरी बेजार झाला आहे. चांगले उत्पन्न आल्यानंतर सरकारचे धोरण आणि व्यापाऱ्यांची एकाधिकारशाहीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्याचवेळी टोमॅटोमुळे ग्राहकांचे बजेट कोलमडणार आहे. टोमॅटोचे भाव पुन्हा गगनाला भिडले आहेत. मुंबईतील वाशीमधील एपीएमसी मार्केटमध्ये टोमॅटोला ४५ रुपये किलो दर मिळत आहे. यामुळे किरकोळ बाजारात 65 ते 75 रुपये प्रतिकिलोपर्यंत टोमॅटो पोहोचला आहे. कांदा आणि टोमॅटो पिकाने पुन्हा एकदा वांदा केला आहे.
आशिया खंडातील कांद्याची अग्रेसर बाजारपेठ म्हणून लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे ओळख आहे. परंतु या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. लासलगाव येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज कांदा बाजार आवारात गेल्या ऑगस्ट महिन्यापासून वेगवेगळ्या कारणांमुळे कांदा लिलाव बंद ठेवला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पर्याय शोधावे लागत आहे.
लासलगाव बाजार समितीत वारंवार कांदा लिलाव बंद ठेवला जात आहे. परंतु उपबाजार विंचूर येथील कांदा बाजार सुरु आहे. यामुळे गेल्या चार महिन्यांत लासलगाव मुख्य कांदा आवारापेक्षाही विंचूरमध्ये जास्त कांदा येत आहे. या ठिकाणी लासलगावपेक्षा 1 लाख 14 हजार क्विंटलने अधिक कांद्याचे लिलाव झाला आहे. विंचूर बाजार समितीच्या कांदा लिलावात ही ऐतिहासिक नोंद आहे.
लासलगाव येथे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि 13 नोव्हेंबरपर्यंत कांदा व्यापाऱ्यांनी अनेक दिवस कांद्याचे लिलाव बंद ठेवले. परंतु विंचूर येथे या दिवसांत कांदा व्यापारी आणि कामगार यांनी कांदा लिलावात सातत्य ठेवले. यामुळे शेतकरी लासलगाव ऐवजी विंचूर बाजारात कांदा विक्रीसाठी आणत आहे. या बाजार समितीत 8 लाख 11 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. आता येणाऱ्या दिवसांत अधिक कांद्याचे लिलाव करुन ही आघाडी कायम ठेवली जाईल, असे लासलगाव बाजार समितीचे संचालक पंढरीनाथ थोरे यांनी सांगितले.