नाशिक, पुणे | 9 डिसेंबर 2023 : कांद्याचे बाजार भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी जाहीर केली आहे. त्यामुळे राज्यातील पुणे, नाशिक, सोलापूरसह राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांदा बंद पुकारण्यात आला. त्याचा परिणाम किरकोळ बाजारात होणार आहे. किरकोळ बाजारात आवक नसल्यामुळे कांदा महागणार आहे. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव सहप्रमुख 15 बाजार समिती आणि दोन खाजगी अशा 17 एकूण बाजार समितीमध्ये कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय नाशिक जिल्हा व्यापारी असोसिएशनने घेतला आहे. परंतु लासलगाव बाजार समितीचे उपबाजार आवार विंचूरमध्ये कांदा लिलाव सुरू होते.
कांदा निर्यात बंदीच्या निर्णयामुळे नाशिक जिल्ह्यात विंचूर येथे गेल्या दोन दिवसात कांद्याचे दर सोळाशे रुपयांनी कोसळले आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. शनिवारी उपबाजार विंचूर येथे कांद्याला जास्तीत जास्त 2901 तर सरासरी 2200 रुपये दर मिळाला. कमीतकमी दर 1000 हजार रुपये प्रतिक्विंटल होता. गुरुवारी कांद्याला जास्तीत जास्त 4501, सरासरी 3800 रुपये तर कमीतकमी 2000 हजार रुपये प्रतिक्विंटल दर होता.
केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी लागू केल्यानंतर राज्यभरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. या निर्णयाविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले आहे. अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन सुरु आहे. पाच राज्यांमध्ये नव्याने कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात येत असताना केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा चुकीचा निर्णय घेतल्याचा आरोप लासलगाव बाजार समितीचे व्यापारी संचालक व कांदा निर्यातदार व्यापारी प्रवीण कदम यांनी केला आहे.
केंद्र सरकारने 31 मार्चपर्यंत कांदा निर्यात बंदी केल्यानंतर चाकण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे भाव क्विंटलला एक हजार ते दीड हजार रुपये कमी झाले आहेत. एकीकडे कांद्याला हमीभाव नाही तर दुसरीकडे निर्यात बंदी केल्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये केंद्र सरकार विरोधात रोष निर्माण झाला आहे.
कांदा प्रश्नावर निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करण्यासाठी सोमवारी दिल्लीत महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली आहे. मंत्री पीयुष गोयल यांच्यासोबत ही बैठक होणार आहे. बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह नाशिकमधील व्यापारी उपस्थित राहणार आहेत. यामुळे आता दिल्लीत होणाऱ्या बैठकीत काय तोडगा निघतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.