नाशिकः नाशिकमध्ये झालेल्या सरपंच संवाद परिषदेत पद्मश्री पोपटराव पवारांनी गावच्या कारभाऱ्यांना कानमंत्र दिला, तर विभागीय आयुक्तांनी धडे दिले. ग्रामीण भागात विविध योजना आणि संकल्पनांची अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने एक व्यासपीठ उपलब्ध होण्यासाठी या सरपंच संवाद परिषदेचे आयोजन नाशिक विभागात करण्यात आले होते. या परिषदेच्या माध्यमातून सरपंचानी शासन आणि ग्रामपंचातीच्या समन्वयाने प्रत्येक गावाचा विकास करावा, असे आवाहन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले. महाराष्ट्र शासन-नाशिक महसूल विभाग, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे अंतर्गत स्थापित एमआयटी – राष्ट्रीय सरपंच संसद यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
ग्रामपंचायतीने नेतृत्व करावे
परिषदेमध्ये पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले की, टीमवर्कने ग्रामविकासाचे यश साधता येते. त्यामुळे सरपंचाने ग्रामसेवक, पशुसंवर्धन विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, कृषी विभाग, वनविभाग यांचा सहकार्याने गावाच्या विकासाशी संबंधित सर्व योजना व लाभ गावकऱ्यांना मिळवून द्यावेत. तसेच ग्रामपंचायतीने प्रत्येक आठवडयाला बैठक घेऊन आढावा घ्यावा. आपल्या गावासह शेजारच्या गावाचाही विकास साधावा, अशी अपेक्षाही यावेळी पवार यांनी व्यक्त केली. ते या कार्यक्रमाला ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते
जलजीवन मिशन
विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले की, गावातील लोकांनी एकत्र येवून गावातील विकासाचे प्रश्न सोडवावेत. तसेच ज्या ठिकाणी आवश्यक असल्यास स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य घ्यावे. माझी वसुंधरा, जलजीवन मिशन, महाआवास अभियान, ईपीक पाहणी या योजनांनाही ग्रामीण भागात गती द्यावी, असेही यावेळी विभागीय आयुक्त गमे यांनी सांगितले. यावेळी गमे यांनी उपस्थित सर्व सरपंचाशी संवाद साधून त्यांच्या शकांचे निरसन केले.
योजनांचे सादरीकरण
महसूल प्रबोधनीचे उपजिल्हाधिकारी तथा निबंधक अरुण आनंदकर यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नाशिक विभागातील महसूल विषयक विविध उपक्रम व महसूल विभागाच्या योजनांच्या माहितीचे सादरीकरण केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोनीया नाकाडे यांनी ग्राम विकास विभागाच्या योजनांची माहिती दिली, तर नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण संस्थेच्या सहसंचालक सुलेखा वैजापूरकर यांनी सुयोग्य नागरी नियोजन याबद्दल माहिती दिली. या परिषदेला एमआयटी- राष्ट्रीय सरपंच संसदचे प्रमुख समन्वयक योगेश पाटील, सहसमन्वय प्रकाश महाले, नामदेवराव गुंजाळ, संजय भाबर, अपर आयुक्त भानुदास पालवे,महसूल प्रबोधनीच्या संचालक गीतांजली बाविस्कर उपस्थित होते.
पाणीपुरवठा बंद असल्याने आज नाशिककरांची निर्जळी; उद्याही कमी दाबाने पाणी, जलवाहिन्यांची दुरुस्ती सुरू
Nashik | कोरोनाचा पुन्हा धसका, मास्क नाही लावल्यास 500 रुपयांचा दंड