जळगाव – जिल्ह्यातील वावडदा गावात महिलांच्या पुढाकारातून, दारूबंदीचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. गावात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध पद्धतीने दारूची विक्री होत होती. याविरोधात महिला आक्रमक झाल्या असून, त्यांनी दारूबंदीची मागणी केली होती. दारूबंदी करण्यासाठी तातडीने ग्रामसभा बोलवण्यात आली. अखेर ग्रामसभेमध्ये दारूबंदीचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयानंतर गावातील महिलांनी जल्लोष केला.
वावडदा हे जिल्ह्यातील एक मोठे गाव आहे. गावात गेल्या काही दिवसांपासून अवैध दारू व्रिकी सुरू आहे. गावातील तरुण आणि अल्पवयीन मुले देखील दारूच्या आहारी गेले होते. दारूमुळे घरगुती हिंसाचारांच्या घटनेत वाढ झाली होती. तसेच कर्जाचे प्रमाणा देखील वाढले होते. दारूमुळे गाव अशांत होते. अखेर महिलांच्या पुढाकारातून दारू बंदी करण्यात आली आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी दारूच्या नशेत असलेल्या एका व्यक्तीने गर्भवती महिलेला भरधाव दुचाकीची धडक दिली. या अपघातामध्ये जखमी झालेल्या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे गावातील महिला आक्रमक झाल्या, आणि त्यांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयावर धडक देत दारूबंदीची मागणी केली. त्यानंतर ठराव संमत करून गावात दारूबंदी करण्यात आली आहे. आता हा दारूबंदीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, पोलीस अधीक्षकांसह सर्व संबंधित अधिकाऱ्यांना पाठवण्यात येणार आहे. गावात अनेक दिवसांपासून अवैध पद्धतीने दारूची विक्री सुरू आहे, मात्र संबंधित दारू विक्रेत्यांवर कारवाई होत नसल्याचा आरोप या महिलांनी केला आहे.
संबंधित बातम्या
… तर राजीवजी आज खूप आनंदी असते; प्रज्ञा यांनी शेअर केला राजीव सातव यांचा संसदेतील व्हिडीओ