कोल्हापूर / 27 जुलै 2023 : राज्यात पावसाने थैमान घातले आहे. कुठे रेड तर कुठे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे अनेक दुर्घटना घडत आहेत. अशीच एक दुर्घटना गुरुवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास कोल्हापुरात घडली आहे. आजरा तालुक्यातील किणे येथे भिंत पडून महिलेचा मृत्यू झाला आहे. तर महिलेचा पती आणि अन्य महिला जखमी झाले आहेत. सुनीता अर्जुन गुडूळकर असे मयत महिलेचे नाव आहे. तर अर्जुन गुडूळकर आणि वत्सला परसु गुडुळकर अशी जखमींची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार समीर माने, निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई यांच्यासह अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
किणे येथे प्राथमिक शाळेसमोर गुडुळकर यांचे घर आहे. गुरुवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास सुनीता गुडुळकर या गोठ्यात गेल्या होत्या. यावेळी त्यांच्या घराची मातीची भिंत कोसळली. ही भिंत गोठ्याच्या चिऱ्याच्या भिंतीवर कोसळल्याने ती भिंतही कोसळली. या भिंतीखाली दबल्याने सुनीता गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. तर त्यांचे पती आणि अन्य एक महिला यात जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली होती.
याआधी खासबाग मैदान संरक्षण भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. संध्या तेली असं मृत महिलेचे नाव आहे. मृत महिला करवीर तालुक्यातील वडणगे गावची रहिवासी आहे. एका कार्यक्रमासाठी केशवराव भोसले नाट्यगृहात आली असताना या दुर्घटनेत तिचा मृत्यू झाला.