परभणी : परभणी (Parbhani) जिल्हात सातत्याने पावसाची रिपरिप सुरूयं. यामुळे शेतजमिनींचे मोठे नुकसान होत असून शेतकरी राजा हवालदिल झाल्याचे चित्र सध्या राज्यात निर्माण झालंय. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात मोठे वादळ आले आणि राजकिय घडामोडींचा प्रचंड वेग आला. त्यामध्ये राज्यात पावसाने जोर धरला असून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरूयं. मात्र, सर्वांचे लक्ष राज्यातील मंत्रीमंडळ विस्ताराकडे लागलेले असताना परभणी जिल्हातील जिंतूर येथील आमदार मेघना बोर्डीकर (Meghana Bordikar) या शेतजमिनीचे पावसामुळे झालेले नुकसान पाहणी करण्यासाठी थेट बांधावरच पोहचल्या आहेत.
परभणीच्या जिंतूर तालुक्यामध्ये जोरदार पाऊस झाल्याने तालुक्यातील आडगाव येथे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचलेले आहे. इतकेच नव्हे तर पावसाच्या पाण्यामुळे पिके देखील वाहून गेली आहेत. शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिंतूर-सेलूच्या भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केलीयं आणि शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन देखील दिले आहे.
परभणी जिल्हातील जिंतूर तालुक्यात मागील काही दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर धरलायं. मात्र, सततच्या पावसामुळे शेतांना तळ्याचे स्परूप आल्याने पिंकाचे मोठे नुकसान होत आहे. जिंतूर-सेलूच्या भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांनी शेतामध्ये जाऊन नुकसान पाहणी केलीयं. यावेळी त्यांच्यासोबत नायब तहसीलदार देखील होती. लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करण्याचे आदेश बोर्डीकर यांनी प्रशासनाला दिले आहेत.