अहमदनगर : राज्यात नुकत्याच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पार पडल्या. त्यानंतर बाजार समितीच्या सभापतींचीदेखील निवडणूक पार पडली. अहमदनगर जिल्ह्यात सभापतीच्या निवडणुकीवरुन भाजपच्या दोन बड्या नेत्यांमध्ये मतभेद निर्माण झाल्याचं चित्र आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे दोनही नेते हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहेत. त्यामुळे हा वाद आणखी वाढतो की तिथेच रोखला जातो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, या प्रकरणात दोन्ही बाजूच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. तसेच ज्यांच्या मुद्द्यावरुन वाद झाला त्यांचीदेखील प्रतिक्रिया समोर आली आहे.
बाजार समिती सभापती निवडणुकीनंतर भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. खासदार सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना छुपा पाठिंबा दिला, असा गंभीर आरोप भाजप आमदार राम शिंदे यांनी केला. त्यावर सुजय विखे पाटील यांनी भूमिका मांडली आहे. तर रोहित पवार यांनी “आम्हाला कुणाच्याही मदतीशिवाय जागा मिळाल्या आहेत”, असा दावा केला आहे.
जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपचे शरद कार्ले यांची ईश्वर चिठ्ठीने निवड झाली असली तर राम शिंदे हे नाराज आहेत. कारण या निवडणुकीत सुजय विखे पाटील यांचे पीए आणि समर्थक कार्यकर्त्यांनी राम शिंदे यांच्या पॅनलच्या विरोधात उमेदवार उभे केले होते. याच मुद्द्यावरुन राम शिंदे नाराज आहेत. राम शिंदे यांनी आज ही नाराजी जाहीरपणे मांडली आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यात भाजपच्या दोन बड्या नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे.
“रोहित पवार आणि सुजय विखे पाटील यांच्या एकत्रित पॅनलेच उमेदवार उभे होते. आम्ही दीड महिना कुठेही भाष्य केलं नाही. शेवटच्या क्षणी का होईना आम्ही सत्तेत आहोत. आमचे खासदार आहेत, मंत्री आहेत, आमची देशात आणि राज्यात सत्ता आहे. अनेक लोक सांगतात की हे ज्या पक्षात जातात, त्यांच्याविरोधात काम करतात. त्याचा प्रत्यय मला आला”, असा आरोप राम शिंदे यांनी केला.
राम शिंदे यांच्या आरोपांना सुजय विखे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं. “राम शिंदे यांच्या मनामध्ये काही नाराजी किंवा शंका असेल, मला असं वाटतं पक्षश्रेष्ठी याबाबत निर्णय घेतील. पक्षश्रेष्ठी आम्हालाही बोलावतील, याबाबत त्यांचे समज-गैरसमज असतील ते दूर होतील, अशी अपेक्षा आहे. जेव्हा अशा निवडणुका होतात तेव्हा अशाप्रकारची नाराजी होऊ शकते. काही चुका प्रत्येकाच्या असतात. आपण एवढी मोठी संघटना चालवतो. वाद होऊ शकतो”, असं सुजय विखे म्हणाले.
“महाराष्ट्र आणि नगर जिल्हा या गोष्टीचा साक्षीदार आहे की, आमच्या परिवाराचा गेल्या 30 वर्षांपासून पवार कुटुंबासोबत संघर्ष सुरु आहे. आपण यूट्यूबवर शोधलं तर विश्लेषकांच्या स्टोरी मिळतील. काही घटनांमुळे शंका निर्माण झाल्या असतील. पण आम्ही पक्षश्रेष्ठींकडे स्पष्टीकरण देवून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करु”, अशी भूमिका सुजय विखे यांनी मांडली.