कुणाल जायकर, Tv9 मराठी, अहमदनगर | 29 सप्टेंबर 2023 : डान्सर गौतमी पाटील हिच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. गौतमी पाटील हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगरमधील तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गौतमी पाटीलच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमांना अनेकदा गालबोट लागल्याचं बघायला मिळतं. तिच्या कार्यक्रमांमध्ये तरुणांकडून हुल्लडबाजी करण्यात येते. तसेच तिच्या नृत्य प्रकारावर तमाशा कलाकारांकडून सातत्याने आक्षेप केला जोताय. गौतमी पाटील नृत्य करत असताना उत्तेजक असे हावभाव करते, असा आरोप केला जातो.
गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाला तरुणांची प्रचंड गर्दी होते. या गर्दीला आवरताना अनेकदा पोलिसांची तारांबळ उडते. पोलिसांकडून अनेकठिकाणी लाठीचार्जही करण्यात आला आहे. गौतमीच्या कार्यक्रमांमुळे पोलीस प्रशासनावर ताण निर्माण होतो. तिच्या कार्यक्रमाला नुकतंच कोल्हापूरमध्ये परवानगी नाकारण्यात आली होती. असं असताना आता अहमदनगरमध्ये तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यभरात गेल्या आठवडाभर गणेशोत्सवाचा उत्साह होता. या गणेशोत्सवादरम्यान गौतमी पाटील हिचा कोल्हापुरात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पण गणेशोत्सव असल्याने सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमांना परवानगी नाकारली होती. या दरम्यान, गणेशोत्स काळात अहमदनगरमध्ये गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याच कार्यक्रमामुळे गौतमीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
अहमदनगर शहरातील पाईपलाईन रोडवर काल सायंकाळी मृत्यूंजय प्रतिष्ठान गुलमोहर रोड आणि एकदंत मित्र मंडळ यांच्यावतीने गौतमी पाटील हिचा नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. हाच कार्यक्रम गौतमी पाटील आणि कार्यक्रमाच्या आयोजकांना भारी पडण्याची शक्यता आहे. कारण पोलिसांनी गौतमी आणि कार्यक्रमाच्या आयोजकांवर कारवाईचा बडगा उचलला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गौतमी पाटील हिचा कार्यक्रम रस्त्यावर मंडप टाकून रहदारीस अडथळा होईल, अशा ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामुळे रहदारीस अडथळा निर्माण झाला. त्यामुळे पोलिसांना आक्रमक पवित्रा घ्यावा लागला. गौतमीच्या विरोधात अहमदनगरमधील तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी गौतमी पाटील हिच्यासह तिचा मॅनेजरवरदेखील गुन्हा दाखल केला आहे. तसेच तिचा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या गणपती मंडळाच्या अध्यक्षांवरही गुन्हा दाखल करण्यात आलाय.
विशेष म्हणजे गौतमी पाटील हिच्याबाबत आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील वलखेडमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेच्या प्रांगणात गौतमीच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला तरुणांनी मोठी गर्दी केली होती.
शाळा ही विद्यार्थ्यांना घडवते, चांगले संस्कार लावते, शाळेचं प्रांगण विद्यार्थ्यांना बऱ्याच गोष्टी शिकवून जातं, असं मानलं जातं. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यातील शाळेतील दिवस विसरु शकत नाही. गौतमीच्या कार्यक्रमात अनेकदा मारामाऱ्या, भांडण, वाद, राडा आणि गोंधळ होतो. त्यातून पोलिसांकडून लाठीचार्ज होतो. नाशिकमध्ये तर गेल्या दोन महिन्यांपूर्वी तिच्या कार्यक्रमात पत्रकारांना मारहाण झाली होती. असं असताना एका शाळेच्या प्रांगणात गौतमीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्यामुळे सर्वसामान्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.