अहमदनगर / 4 ऑगस्ट 2023 : ट्रेकिंगसाठी हरिश्चंद्र गडावर गेलेल्या एका पर्यटकाचा थंडीने गारठून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना अहमदनगरमध्ये घडली. बाळू नाथाराम गिते असे मयत पर्यटकाचे नाव आहे. तर अन्य तिघांचीही प्रकृती खालावली. गावकरी, वनविभाग आणि पोलीस प्रशासनाने मयत व्यक्तीसह पर्यटकांना गडावरून रेस्क्यू केले. तिघांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. रस्ता भरकटल्याने ते जंगलात अडकले होते. यादरम्यान थंडीमुळे गारठल्याने एकाचा मृत्यू झाला. भरपावसात नको ते धाडस करणे तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. बाळू गिते याचा मृतेदह शवविच्छेदनासाठी राजूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी राजूर पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मुंढे आणि पोलीस कॉन्स्टेबल सांगळे हे करीत आहेत.
पुण्याहून सहा मित्र हरिश्चंद्र गडावर ट्रेकिंगला गेले होते. या सहा जणांनी 1 ऑगस्टला सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास तोलार खिंडीतून गड चढायला सुरवात केली. मात्र सध्या गडावर प्रचंड धुके असल्याने पर्यटक रस्ता भरकटले. यामुळे या तरुणांनी डोंगर कपारीत मुक्काम केला. भर पावसात ते जंगलात अडकले होते. यावेळी थंडी आणि पावसामुळे चौघांची प्रकृती बिघडली. यापैकी बाळू गिते याची प्रकृती अत्यवस्थ झाली आणि त्याचा तेथेच मृत्यू झाला.
बाळू नाथाराम गिते, अनिल मोहन आंबेकर, गोविंद दत्तात्रय आंबेकर, तुकाराम आसाराम तीपाले, महादू जगन भुतेकर, हरिओम विठ्ठल बोरुडे अशी सहा जणांची नावे असून, सर्व पुण्यातील कोहगाव येथील रहिवासी आहेत. एका तरुणाने आरडाओरडा केल्याने सदर घटना उघड झाली. मुंबईतील एका ग्रुपने गाईड बाळू रेंगडे यांस याबाबत माहिती दिली. यानंतर बाळू रेंगडे यांनी तात्काळ गडावर धाव घेतली. तसेच तोलारखिंड तपासणी नाक्यावरील वन संरक्षक, राजूर पोलीस, वनविभाग आणि गावकऱ्यांनाही रेंगडे यांनी माहिती दिली. यानंतर सर्वांनी गडावर दाखल होत त्यांनी तरुणांना रेस्क्यू केले. तर मयताचा मृतदेहही खाली आणला. अन्य तिघांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.