“21 वर्षे पतीकडून काम करुन घेतलं, वेतन नाही, मृत्यूनंतरही न्याय नाही”, पीडितेचा आत्मदहनाचा इशारा

| Updated on: Jul 01, 2021 | 6:04 AM

जिल्ह्यातील शेवगावच्या कांचन बनसोडे या महिलेने आपल्या पतीकडून 21 वर्षे पूर्णवेळ अधिव्याख्याता म्हणून काम करुन घेऊनही वेतन न दिल्याचा आरोप केलाय. तसेच पतीच्या मृत्यूनंतरही जो अनुषंगिक लाभ मिळायला हवा तो न मिळाल्याची तक्रार केलीय.

21 वर्षे पतीकडून काम करुन घेतलं, वेतन नाही, मृत्यूनंतरही न्याय नाही, पीडितेचा आत्मदहनाचा इशारा
पीडित मृत अधिव्याख्याते बाळासाहेब बनसोडे यांची पत्नी आणि आई
Follow us on

अहमदनगर : जिल्ह्यातील शेवगावच्या कांचन बनसोडे (Kanchan Bansode) या महिलेने आपल्या पतीकडून 21 वर्षे पूर्णवेळ अधिव्याख्याता म्हणून काम करुन घेऊनही वेतन न दिल्याचा आरोप केलाय. तसेच पतीच्या मृत्यूनंतरही जो अनुषंगिक लाभ मिळायला हवा तो न मिळाल्याचं म्हटलंय. या मागण्यांसाठी त्यांनी 17 दिवस उपोषण केलं, मात्र त्यांच्यावर हल्ला झाला. यानंतरही अद्याप न्याय न मिळाला नाही, असा आरोप केलाय. तसेच आता अखेर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना न्याय देण्याची मागणी केलीय. यानंतरही न्याय मिळाला नाही तर आपल्यासमोर आत्मदहनाशिवाय दुसरा मार्ग शिल्लक राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिलाय. पीडित कांचन बनसोडे यांनी याबाबत उदय सावंत यांना मागणी पत्रही दिलंय (Allegations of no full salary after 21 years teaching in Shevgaon Ahmednagar).

21 वर्ष ते शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास दिल्याचा आरोप

कांचन बनसोडे यांनी आपल्या निवेदनात म्हटलं, “माझे पती प्रा. बाळासाहेब नामदेव बनसोडे (Balasaheb Bansode) हे आबासाहेब काकडे कला महाविद्यालय, बोधेगाव, ता.शेवगाव, जि. अहमदनगर (Abasaheb Kakade College) येथे 30 जून 1999 ते 25 ऑगस्ट 2020 पर्यंत राज्यशास्त्र विषयाचे पूर्णवेळ अधिव्याख्याता या पदावर कार्यरत होते. 26 ऑगस्ट 2020 रोजी त्यांचं हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. त्यामुळे माझ्यावर व माझ्या कुटुंबावर खूप वाईट परिस्थिती आली आहे. शिक्षण सहसंचालक पुणे विभाग पुणे व महाराष्ट्र शिक्षण मंडळ शेवगावच्या आबासाहेब काकडे कला महाविद्यालयाचे प्राचार्य या सर्वांनी मिळून माझे पती मागासवर्गीय असल्यामुळे त्यांच्यावर अन्याय केला आहे. गेली 21 वर्ष ते शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करीत होते. शेवटी हा त्रास सहन न झाल्यामुळे त्यांचे निधन झाले.”

“न्यायासाठी 17 दिवस उपोषण केल्यानंतर प्राणघातक हल्ला”

“माझ्या पतीला न्याय मिळविण्यासाठी मी शेवगाव पोलीस स्टेशनसमोर आमरण उपोषणाचा मार्ग देखील अवलंबला होता. मात्र 17 दिवस उपोषण केल्यानंतर माझ्यावर प्राणघातक हल्ला करवून माझे उपोषण उधळून लावण्यात आले. उपोषणानंतर शिक्षण संचालक उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य (पुणे) व शिक्षण सहसंचालक उच्च शिक्षण पुणे यांच्या दालनात अनेकदा सुनावणी झाल्या. मोहन खताळ (शिक्षण सहसंचालक पुणे) व दिगंबर गायकवाड (शिक्षण सहसंचालक औरंगाबाद) यांच्या अध्यक्षते खाली महाविद्यालयाच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले. अहवाल सादर करण्यात आले व हा अहवाल शेवटी उच्च शिक्षण संचालक धनराज माने यांनी या प्रकरणी योग्य आदेशासाठी शासनाकडे पाठविला,” असं कांचन बनसोडे यांनी सांगितलं.

“न्याय मिळाला नाही तर आत्मदहनाशिवाय दुसरा मार्ग नाही”

कांचन बनसोडे यांनी पुढे म्हणाल्या, “पतीच्या मृत्यूमुळे व कोरोनाच्या महामारीमुळे माझ्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. माझे व माझ्या कुटुंबियाचे जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे मी आता 26 ऑगस्टपासून शिक्षण संचालक कार्यालयासमोर आमरण उपोषण करेल. तरीही न्याय मिळाला नाही तर आत्मदहन करण्याशिवाय माझ्या समोर दुसरा मार्ग उरलेला नाही. त्यामुळे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष देऊन मला न्याय मिळवून द्यावा ही नम्र विनंती.”

“डोळ्यानं दिसंना, काम होईना, तुमच्या पाया पडते, माझ्या लेकराच्या कष्टाचं आहे तेच द्या”

मृत अधिव्याख्याते बाळासाहेब बनसोडे यांच्या वयोवृद्ध आईने देखील मुलाच्या कष्टाचे वेतन देण्याची मागणी केलीय. त्या म्हणाल्या, “डोळ्यानं दिसंना, काम होईना, आजारी पडते आहे. तुमच्या पाया पडते, माझ्या लेकराच्या कष्टाचं आहे तेच द्या.”

हेही वाचा :

पनवेलमध्ये अखिल भारतीय समता परिषदेचे रास्तारोको आंदोलन, आंदोलक ताब्यात

‘रक्त सांडलं तरी जमिनी देणार नाही’, पुणे-नाशिक रेल्वे भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध

नवी मुंबईत ओबीसी आरक्षण आंदोलनामुळे मनाई आदेशाचा भंग, चित्रा वाघ यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

व्हिडीओ पाहा :

Allegations of no full salary after 21 years teaching in Shevgaon Ahmednagar