अहमदनगर | 19 सप्टेंबर 2023 : देशद्रोही झाकीर नाईककडून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संस्थेत पैसे आल्याच्या आरोपानंतर खासदार संजय राऊत यांनी विखेंवर नव्या आरोपांवरुन निशाणा साधलाय. विखे पाटलांच्या प्रवरानगर सहकारी साखर कारखान्यात 191 कोटींच्या घोटाळा झाल्याचा आरोप होतोय. तर हा आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा म्हणत विखेंनी ते फेटाळून लावले आहेत. पण या आरोप-प्रत्यारोपांवरुन चर्चांना उधाण आलंय.
अहमदनगरच्या प्रवरानगरमध्ये पद्मश्री विठ्ठलराव विखे-पाटील साखर कारखाना आहे, जो महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या ताब्यात आहे. याच प्रवरातल्या शेतकरी मंडळाच्या अध्यक्षांसह त्यांच्या सहकाऱ्यांनी बनावट कागदपत्रांद्वारे कर्ज व्यवहार झाल्याचं म्हणत घोटाळ्याचा आरोप केलाय. याबाबत त्यांनी नगर जिल्हा बँक तसंच साखर संचालकांकडे तक्रारही केलीय.
विखे-पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक अहवाल आणि ताळेबंदात फेरबदल करुन 191 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. विखे-पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळानं 2020-21 चा वार्षिक अहवाल सर्वसाधारण सभेत मंजूर केला. त्यानुसार 2020-21 च्या ताळेबंदात कारखान्याचा तोटा 170 कोटी 19 लाख 6 हजार रुपये इतका होता.
2021-22 च्या वार्षिक अहवालात नफा-तोटा पत्रकात तोट्याची रक्कम नील अर्थात शून्य दाखवण्यात आली. 21 मार्च 2021 च्या आर्थिक पत्रकाप्रमाणे कारखान्याचा संचित नफा देखील नील अर्थात शून्य दाखवण्यात आला. मात्र 21 मार्च 2022 च्या आर्थिक पत्रकात संचित नफा 21 कोटी 43 लाख 85 हजार 652 रुपये दाखवण्यात आला आहे. यात तफावतीवरुन आरोप करण्यात येत आहेत.
थोडक्यात काय तर 2020-21 च्या अहवालात कारखान्याला 170 कोटींचा तोटा झाल्याचं म्हटलंय. आणि 2021-22 च्या अहवालात 21 कोटींहून जास्तीचा नफा दाखवला गेलाय. हा प्रकार कारखान्याला वाढीव कर्ज मिळावे यासाठी झाल्याचा आरोप प्रवरा शेतकरी मंडळानं केला आहे. याआधी भारतातून फरार झालेला आणि देशद्रोही ठरवला गेलेल्या झाकीर नाईकनं विखेंच्या संस्थेत कोट्यवधींची देणगी दिल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता. ते आरोप विखेंनी फेटाळले होते.