सातारा : पाटण तालुक्यातील आंबेघरमध्ये (Ambeghar landslide) दरड कोसळून 14 ते 16 लोक दबले आहेत. 23 जुलैला तुफान पावसाने आंबेघरमध्ये दरड कोसळल्याची माहिती समोर आली. घटनेची माहिती समोर आल्यानंतर 35 तास उलटले तरीही अजून मदत आणि बचावकार्यासाठी इथे यंत्रणाच पोहोचली नाही. टीव्ही 9 मराठीचे कराडचे प्रतिनिधी दिनकर थोरात (Dinkar Thorat) हे चार तासांची पायपीट करत, डोंगर, दरे, ओढे, नाले पार करत आंबेघरमध्ये पोहोचले.
आंबेघर हा एक पाडा आहे. या गावात 8 घरं होती. यापैकी 4 घरांवर दरड कोसळून या घरातील 14 ते 16 लोक दबले आहेत. दुर्घटनेला 35 तास होऊन गेले मात्र मदत आणि बचावकार्य सुरु झालं नाही. आसपासच्या गावातील नागरिकांनी या गावात धाव घेऊन बचावकार्य सुरु केलं.
आंबेघरमधील एका घराच्या मागे गोटा होता. त्यावर दरड कोसळून दोन म्हशी दबल्या गेल्या. जवळपास 35 तासांनी या दोन म्हशी बाहेर काढल्या. या म्हशी गाळात रुतल्या होत्या. गोठ्याची उरलेली भिंत पाडून या म्हशींना आधी श्वासोश्वासाची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर गाळात रुतलेल्या म्हशी गावकऱ्यांनी कशाबशा हलवल्या. यंत्रणा नसल्याने गावकरी हाताने चिखल काढत आहेत.
आंबेघर हे पाटण तालुक्यातील गाव आहे. पाटणपासून पुढे मोरगिरी बाजारपेठ आहे, मोरगिरीपासून 10 ते 12 किमी अंतरावर आंबेघर गाव आहे. त्या गावची एक वाडी होती, त्या वाडीत 8 ते 9 घर होती. आंबेघरच्या अगदी पायथ्याशी गुरेघर हे धरण आहे. मोरणा नदीवर हे धरण बांधले आहे. आंबेघर हे अगदी डोंगरावर असणारे गाव आहे, यापूर्वी कधीही अशी घटना या भागात घडली नाही ती यंदा घडली.
टीव्ही 9 मराठीचे प्रतिनिधी चार तास, 6 किमीची पायपीट करत आंबेघरमध्ये पोहोचले. त्यांनीही वार्तांकन करत स्थानिकांना मदत कार्यात हातभार लावला. चार ओढे पार करुन, डोंगर चढून उतरणे, पायवाट आहे, अशी पायपीट दिनकर थोरात यांनी केली.
मोरणा धरणापर्यंत रस्ता होता, तो वाहून गेला. कुठलीच यंत्रणा जाणार नाही अशी परिस्थिती तिथे आहे. यंत्राशिवाय माणसांनीच मदत आणि बचावकार्य करावा लागण्याची स्थिती आंबेघरमध्ये आहे. नेहमीच्या वाटा बंद झाल्या आहेत.
आंबेघर पाडावस्ती आहे. इथे 8 घरं आहेत, त्यापैकी 4 घरं दबली आहेत. 4 घरातील 16 माणसं ढिगाऱ्याखाली दबली. या घरातील 14 लोक आणि त्यांच्या घरी भात लावणीसाठी आलेले दोन पाहुणे असे 16 लोक दबले. यामध्ये उत्तम कोळेकर यांच्या कुटुंबाचा समावेश आहे.
उत्तम कोळेकर यांचं कुटुंब चिखलात दबलं आहे. उत्तम कोळेकर आणि त्यांच्या तीन भावांचं घर मलब्याखाली दबलं. यामध्ये तीन भाऊ, त्यांच्या पत्नी आणि पाहुणे असा समावेश आहे. कोळेकर कुटुंबातील मुली पुणे आणि मुंबईला होत्या, त्या आज पाटणमधून टीव्ही 9 मराठीच्या प्रतिनिधींसोबत चालत आंबेघरमध्ये पोहोचल्या.
रायगडमधील तळीये गावात दरड कोसळल्याची घटना घडली असताना, तसाच प्रकार साताऱ्यातील पाटण तालुक्यात घडला. आंबेघर या गावात दरड कोसळून जवळपास 15 लोक ढिगाऱ्याखाली दबले. 23 जुलैला दुपारी हा प्रकार समोर आला. गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याचं सांगण्यात येत तआहे. आंबेघर येथील काही घरे या मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली आहेत. या घटनेची माहिती समजताच काही ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले.
साताऱ्याच्या आंबेघरमध्ये 35 तासानंतरही मदत मिळालेली नाही. अनेक लोकं आ मदतीविना आहेत. घटनेला 35 तास उलटूनही त्यांच्यापर्यंत मदत मिळाली नाहीय. स्थानिक लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरु आहे. टीव्ही 9 ची टीम तिथे पोहोचली आहे. तिथे गेल्यानंतर प्रशासनाची टीम पोहोचली नसल्याचं समोर आलं. प्रशासन जरी पोहोचलं नसलं तरी स्थानिकांनी बचावकार्य सुरु ठेवलं आहे. लवकरात लवकर मदत पोहोचती आहे, असं उत्तर सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिलं आहे.
संबंधित बातम्या
Satara | देवरुखवाडीवर दरड कोसळून 5 घर मातीच्या ढिगाऱ्यात, 27 नागरिक सुखरुप बाहेर
Satara Landslide: साताऱ्यात आंबेघर गावात दरड कोसळली, 12 जणांचा मृत्यू