अमरावती: नाशिक आणि अमरावती पदवीधर मतदारसंघ तसेच नागपूर, कोकण आणि औरंगाबाद शिक्षक मतदारसंघासाठी काल सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू झाली. यापैकी नाशिक, नागपूर, कोकण आणि औरंगाबादच्या निवडणुकीचे निकाल लागले. रात्री उशिरापर्यंत हे निकाल लागले. मात्र, आज दुसरा दिवस उजाडला तरी अमरावती पदवीधर मतदारसंघाचा निकाल लागला नाही. त्यामुळे उमेदवाराचं टेन्शन वाढलं असून कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली आहे.
अमरावती पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे आणि भाजपचे रणजित पाटील यांच्यात लढत आहे. काल दुपारी धीरज लिंगाडे हे 2 हजार मते घेऊन आघाडीवर आहेत. एकूण 28 पैकी 18 टेबलांवरील मतमोजणीत लिंगाडे आघाडीवर होते. सध्या पसंती क्रमांक दोनची मोजणी सुरू आहे. त्यामुळे या मतमोजणीत कुणाचा विजय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
भाजपचे उमेदवार रणजीत पाटील यांनी फेर मतमोजणीची मागणी केली होती. तब्बल 8 हजार अवैध मते आढळून आल्याने पाटील यांनी फेर मतमोजणीची मागणी केली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने फेर मतमोजणी सुरू केल्याने हा निकाल रखडला आहे.
रणजित पाटील यांनी फेर मतमोजणीची मागणी केली. अवैध मते बाद झाल्यास आपला विजय होईल, असा पाटील यांचा कयास होता. अवैध मते धीरज लिंगाडे यांना पडल्याचा पाटील यांचा अंदाज होता. पण त्यांचा हा अंदाज फोल ठरला आहे. 8 हजार अवैध मतांपैकी धीरज लिंगाडे यांना केवळ 32 मते मिळाली होती. लिंगाडे यांची ही 32 अवैध मते बाद ठरली आहेत.
मात्र, रणजित पाटील यांना या 8 हजार अवैध मतांपैकी 4500 ते 5000 अवैध मते मिळाली. त्यामुळे पाटील यांची ही अवैध मते बाद करण्यात आली आहे. त्यामुळे पाटील यांचचं नुकसान झालं आहे. फेर मतमोजणी करण्याची मागणी पाटील यांच्या अंगलट आल्याचं फेर मतमोजणीतून दिसून आलं आहे.
दरम्यान, फेर मतमोजणीतही लिंगाडे आघाडीवर आहेत. लिंगाडे यांना 43 हजार 577 मते मिळाली आहेत. तर रणजित पाटील यांना केवळ 41 हजार 248 मते मिळाली आहेत. लिंगाडे हे 2366 मते घेऊन आघाडीवर आहेत. त्यामुळे लिंगाडे यांचा विजय निश्चित मानला जात आहे. तासाभरात या निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.