पालघर/मोहम्मद हुसेन : वारंवार सूचना देऊनही विद्यार्थ्यांनी केस न कापल्याने शेवटी शाळेच्या मुख्याध्यापकांनी स्वतःच कात्री घेऊन विद्यार्थ्यांचे केस कापल्याचा धक्कादायक प्रकार सेक्रेड हार्ट इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घडला आहे. मुख्याध्यापकांच्या या कृतीमुळे पालकवर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. हरिश दुबे असे मुख्याध्यापकाचे नाव आहे. या प्रकाराबाबत पालकांनी शिक्षण विभाग आणि पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करीत मुख्याध्यापक हरिश दुबेवर कारवाईची मागणी केली आहे.
पालघर लोकमान्य नगर येथील सेक्रेड हार्ट इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील मुख्याध्यापकांनी नववी इयतेमधील विद्यार्थ्यांचे वाढलेले केस कैचीने शाळेत सर्व विद्यार्थ्यासमोरच कापले. याआधी अनेक वेळा मुलांना वाढलेले केस कापण्यास सांगण्यात आले होते. मात्र मुलं शिक्षकांचं ऐकत नव्हती.
केस कापण्यासाठी शिक्षक अनेक वेळा विद्यार्थ्यांना सांगत होते. शिक्षकांकडून अनेक वेळा विद्यार्थ्यांना समजही देण्यात आली होती. मात्र समज देऊनही मुलं मुख्याध्यापक आणि शिक्षकांवरच उलट अरेरावी करीत होती. त्यामुळे शेवटी मुख्याध्यापकांनीच त्या सहा मुलांचे केस कापले, असे स्पष्टीकरण शाळेचे सचिव जितेंद्र दुबे यांनी दिले आहे.
मुख्याध्यापकांच्या या भूमिकेमुळे पालकवर्ग मात्र संतापला आहे. आमच्या मुलांनी नैराश्येतून जीवाचे बरेवाईट केल्यास ह्याला जबाबदार कोण? असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला. या प्रकरणी एका पालकाने शिक्षण विभागासह पोलीस स्थानकात तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांना समजून घेऊन परिस्थितीअनुरूप कृती करणे अपेक्षित होते असं पालाकांचे म्हणणं आहे. विद्यार्थ्यांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्यास पालकांना शाळेमध्ये पाचारण केलेले असते तर अधिक संयुक्तिक ठरले असते असे पालकांचे म्हणणे आहे. केस कापल्याने आम्ही बाहेर आल्यावर आम्हाला पाहून सर्व विद्यार्थी हसत असल्याने आम्हाला खूप वाईट वाटले असल्याची खंत विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.
इतर बातम्या
Exam Scam: पिंपरी चिंचवड पोलीस भरती कॉपी प्रकरणी औरंगाबादेतील पोलिसासह दोघे ताब्यात!
NCRB | महाराष्ट्रातून गेल्या वर्षी 63 हजार महिला बेपत्ता, 183 जणींची अनैतिक संबंधांतून हत्या : अहवाल