कोल्हापूर : हातकणंगले बसस्थानक परिसरात अडिच वर्षाच्या बाळाच्या विक्री (Baby Selling)च्या प्रयत्नात असलेल्या पाच जणांना हातकणंगले पोलिसांनी सापळा रचून अटक (Arrest) केली. तर यातील एक जण फरार (Absconding) झाला आहे. संतोष पुरी, शिवपुरी गोस्वामी (40, रा. बेकाराई तालुका सारडा जिल्हा भीलवाडा राज्य राजस्थान), दिनेश नंदलाल बनभैरू (36, रा. लाडा प्लॉट अकोला नाका वाशिम जिल्हा), कुसुमबाई देविदास गायकवाड (40, रा. राहुल नगर नांदेड), लक्ष्मी आदेश खरे (40, तेरा नगर नांदेड), ललिता भिसे (रा. कोरोची तालुका हातकणंगले) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
हातकणंगले येथील बसस्थानकात अडिच वर्षाच्या बालकाच्या विक्रीसाठी काही लोक येणार असल्याची गोपनीय माहिती हातकणंगले पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक के. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून बाळाच्या विक्रीच्या प्रयत्नात असलेल्या संतोष पुरी, शिवपुरी गोस्वामी, दिनेश नंदलाल बनभैरू, कुसुमबाई देविदास गायकवाड, लक्ष्मी आदेश खरे, ललिता भिसे यांना त्यांच्या ताब्यातील लहान बाळासह ताब्यात घेण्यात आले. संबंधित बाळास बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे.
सर्व आरोपींना जिल्हा सत्र न्यायालय कोल्हापूर यांच्यासमोर हजर केले असता त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. यातील आणखी एक आरोपी महेश चौधरी राहणार नांदेड हा पसार झाला आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
तसेच यातील लहान बाळाबाबत कोणाला काही माहिती असल्सया त्यांनी हातकणंगले पोलीस ठाणे संपर्क करावा असे आव्हान करण्यात आले आहे. याप्रकरणी अधिक तपास हातकणंगले पोलीस करत आहेत.