निलेश डाहाट, प्रतिनिधी, चंद्रपूर : चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती बिघडली. धानोरकर यांना एयर अॅम्बुलन्सद्वारे नागपूर येथून नवी दिल्लीत उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे. याआधी त्यांच्यावर नागपुरात खाजगी रुग्णालयात किडनी स्टोन शस्त्रक्रिया करण्यात आली होती. सुमारे 8 वर्षांपूर्वी त्यांनी स्थूलतेची शस्त्रक्रियादेखील करवली होती. 2 दिवसांपूर्वी झालेल्या शस्त्रक्रियेदरम्यान त्यांना आतड्याचे इन्फेक्शन झाले. त्यावर अधिक उपचारासाठी नागपूरहून दिल्लीला विशेष एअर ॲम्बुलन्सने रवाना करण्यात आले.
खासदार धानोरकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने जारी एका प्रसिद्धीपत्रकात त्यांनी आपण दिल्लीच्या वेदांता इस्पितळात उपचार घेणार असल्याचे सांगितले. डॉक्टरी सल्ल्यानुसार काही काळ उपचार आणि विश्रांती घेणार असल्याचे म्हटले आहे.
बाळू धानोरकर आणि त्यांचे वडील नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. काल बाळू धानोरकर यांच्या वडिलांचे वृद्धापकाळाने निधन झाले. आज भद्रावती येथे बाळू धानोरकर यांच्या वडिलांच्या पार्थिवावर अंतीम संस्कार करण्यात आले.
बाळू धानोरकर यांनी काल वडिलांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. पण, आज भद्रावती येथे झालेल्या अंतीम संस्काराला बाळू धानोकर हे उपस्थित राहू शकले नाही. कारण त्यांची स्वतःची प्रकृतीदेखील चांगली नव्हती. शेवटी बाळू यांचे भाऊ अनिल धानोरकर यांनी वडिलांच्या पार्थिवावर अंतीम संस्कार केले.
अनिल धानोरकर हे भद्रावतीचे नगराध्यक्ष आहेत. भद्रावती हा शिवसेनेचा गड आहे. बाळू धानोरकर यांचे वडील हे शिक्षक होते. आज त्यांच्या पार्थिवावर अंतीम संस्कार करण्यात आले. पण, त्यासाठी मुलगा बाळू धानोरकर हे त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू शकले नाही.
बाळू धानोरकर यांच्या साळ्याच्या मागे ईडी लागली आहे. या सर्व प्रकरणांमुळे धानोरकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. एकीकडे प्रकृती साथ देत नाही. दुसरीकडे त्यांच्या साळ्यामागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे.