सातारा: भाजप नेत्या पंकजा मुंडे, राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule and Pankaja Munde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्या विरोधात कीर्तनकार बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण राज्यात त्याचे पडसाद उमटल्यानंतर आज अखेर बंडातात्या कराडकर यांनी माफी मागितली आहे. बाळासाहेबांच्या बरोबर मी ज्या लोकांबद्दल नाव घेतली. त्यांच्याबद्दल माझ्या मनात आकस नाही किंवा त्यांचा द्वेष करत नाही. राजकीय हेतूने हे आरोप केले नाहीत. ज्या चार लोकांवर मी आरोप केले त्यांचीच नव्हे तर इतर लोकांचीही माफी मागत आहे. माझं विधान अनावधानाने झालं आहे. त्याबद्दल मी क्षमा मागत आहे, असं बंडातात्या कराडकर यांनी सांगितलं. पोलीस त्यांची ड्युटी करतील. त्यांना आदेश आहेत त्याप्रमाणे ते मला ताब्यात घेतील. आम्ही अटक करून घेऊ, असंही कराडकर यांनी सांगितलं.
बंडातात्या कराडकर यांनी टीव्ही9 मराठीशी विशेष संवाद साधला. राज्य सरकारने वाईन विक्रीचा घेतलेला निर्णय चुकीचा आहे. माझ्या या विधानावर मी ठाम आहे. समाजाविरोधातील हा निर्णय आहे. महिला, मुलं आणि इतरांसाठी हा निर्णय चुकीचा आहे, असं बंडातात्या कराडकर यांनी सांगितलं.
सुप्रियाताई आणि मी अनेकवेळेला एकत्र आलो आहे. आम्ही बोललो आहे. मी त्यांना ताई म्हणतो. पंकजा यांना भेटलो नाही. पण त्यांचे वडील गोपीनाथ मुंडे यांचं आणि माझं प्रेमाचं नातं होतं. शरद पवार आणि मी आमच्या वयात दहा-बारा वर्षाचा फरक असला तरी मी सुप्रियाताईंना मी कन्येच्या ठिकाणी मानतो. पंकजा यांनाही कन्येच्या ठिकाणी मानतो. त्यांच्या भावनांचा उद्रेक झाला असेल तरी या दोन्ही माझ्या मुली समजून बाप या नात्याने मी क्षमा मागत आहे. त्याबद्दल मला कोणताही कमीपणा वाटत नाही. त्याचबरोबर मी त्यांना विनंती करेल की तुमच्या अनुयायांच्या भावनांचा उद्रेक होऊ नये याची त्यांनी दक्षता घ्यावी, असं ते म्हणाले.
सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांच्याबद्दल मी आकसाने बोललो नाही. मी केवळ समाजातील ऐकिव माहितीवर ते विधान केलं होतं. माझं पंकजा मुंडे आणि सुप्रिया सुळे यांच्याशी माझं बोलणं झालं नाही. त्यांना भेटून मी दिलगीरी व्यक्त करणार आहे. पंकजा आणि सुप्रियाताई यांचं वर्तन चुकीचं नाही. त्या सदाचारी आहेत. या दोन्ही नेत्या निर्व्यसनी आहेत, असं कराडकर म्हणाले.
राजकीय नेते काही बोलतात त्यामागे काही राजकीय हेतू असतो. आमचा तसा राजकीय हेतू नाही. अजित पवार यांच्याबद्दल मला आदरच आहे. मी फक्त वाईनच्या निर्णयावर व्यवहारातील म्हण म्हटली होती. ढवळ्याशेजारी पोवळा बांधला असं मी म्हटलं. केवळ धार्मिक निर्णयाच्या अनुषंगाने मी बोललो होतो. वारकरी संप्रदायाचा पाईक म्हणून बोलतो. धार्मिक निर्णय लादले जातात, त्यावर मी भूमिका घेतली आहे ती चूक आहे असं मला वाटत नाही, असं त्यांनी सांगितलं. राजकीय नेत्यांची माफी मागितल्याने माझं अध्यात्मिक आणि नैतिक वजन वाढलंच आहे, असंही त्यांनी सांगितलं. माझ्या 70 वर्षाच्या जीवनात माझा कुठेच वाकडा पाय पडला नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
संबंधित बातम्या:
Maharashtra News Live Update : नांदेडमधील तिन्ही नगराध्यक्षपदांची निवडणूक 14 फेब्रुवारीला
vastu | घरात झाडं लावताय ? मग राशीनुसार रोपे लावा मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील