बेळगाव: बेळगाव महानगरपालिकेसाठी आज तब्बल आठ वर्षानंतर मतदान होत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून संपूर्ण कर्नाटक राज्याच आणि पश्चिम महाराष्ट्राच लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. या निवडणुकीत पहिल्यांदाच राष्ट्रीय पक्ष म्हणजे भाजप आणि काँग्रेस हे उतरले आहेत. त्यांच्यासमोर महाराष्ट्र एकीकरण समितीचे तगडे आव्हान आहे.
एकूण 58 जागांसाठी शुक्रवारी मतदान होत असून महाराष्ट्र एकीकरण समितीमार्फत अधिकृत 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया चालणार असून मतदानाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण बेळगाव शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या निवडणुकीसाठी बेळगावात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शेजारच्या बागलकोट जिल्ह्यातून अतरिक्त कुमक मागवण्यात आली होती. राज्य राखीव दलाच्या सहा तुकड्या, गृहरक्षक दलाचे 300 जवान आणि बागलकोट तालुक्यातील पोलीस जवान याठिकाणी तैनात आहेत. शहरातील संवेदनशील आणि अतिसंवेदनशील भागांसह बहुतेक ठिकाणी पोलिसांकडून पथसंचलन करण्यात आले होते.
बेळगावसह हुबळी-धारवाड आणि कलबुर्गी या महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली होती. आता सप्टेंबरला बेळगाव महानगरपालिकेचा निकाल जाहीर होईल.
बेळगाव महानगरपालिकेसमोर (Belgaum Municipal Corporation) काही दिवसांपूर्वी लाल पिवळा ध्वज लावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. कन्नड रक्षण वेदिकेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी हे कृत्य केलं. लाल पिवळा ध्वज लावण्यावरून बेळगावमध्ये तणाव निर्माण झाला होता. अनधिकृत ध्वजावरुन गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात तणावाचं वातावरण होते. त्यात कालच्या प्रकाराने अजून तणावात वाढ झाली होती.
बेळगाव महापालिकेसमोर कन्नड ध्वजस्तंभ 28 डिसेंबर 2020 रोजी स्थापित करण्यात आला होता. 6 महिन्यांपासून ऊन, वारा, पावसामुळे ध्वज फाटला असल्याचं कारण देत तोच ध्वज बदलण्याची मागणी होत असताना जुना ध्वज काढून नवीन बसवण्याची मागणी करणाऱ्या कार्यकर्त्यांनी तिथेच जोरदार राडा केला.
गेले अनेक दिवस आवाहन करून देखील जिल्हा प्रशासन यासंदर्भात पाऊल उचलत नाही. ध्वज खांबावरती नवीन ध्वज बसवत नाही. मग आम्हीच नवीन ध्वज बसवण्यासाठी निघालो होतो, पण पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलं.
ध्वजारोहन करण्यासाठी कार्यकर्ते निघाले असता दहा कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केलीय. पोलीसांनी जबरदस्तीने ताब्यात घेतल्या बद्दल कार्यकर्त्यांनी यावेळी संताप व्यक्त केला तसेच पोलिसांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
हे ही वाचा :
बेळगाव महापालिकेसमोर भगवा फडकवणारच, कोल्हापूरच्या शिवसैनिकांचं बेळगावकडे कूच