अमरावती: अमरावतीतील परिस्थिती काल संध्याकाळी नियंत्रणात आलेली वाटत असतानाच आज पुन्हा अमरावती पेटले. आज भाजपने बंद पुकारलेला असताना हा बंद शांततेत पार पडेल असं वाटत असतानाच अचानक राजकमल चौकात एक मोठा जमाव आला आणि त्यांनी प्रचंड धुडगूस घातला. हा जमाव मिळेल त्या दुकानांवर दगडफेक करत होता. हातात काठ्या घेऊन जोरदार घोषणाबाजी करत तोंडाला रुमाल बांधलेला हा जमाव रस्त्यावरून धुडगूस घालत होता. त्यामुळे वातावरण अधिकच तापले होते. पोलिसांनाही जमावाला नियंत्रित करणं कठिण जात होतं. हा जमाव किती आक्रमक आणि अनियंत्रित झाला होता व्हिडीओंमधून दिसत आहे.
बंदच्या पार्श्वभूमीवर काही तोडफोडीच्या घटना घडल्या. त्यानुसार फौजदारी दंड प्रक्रिया संहितेच्या कलम 144 (1), (2), (3) अन्वये पोलीस आयुक्त कार्यालयाकडून संचारबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. अमरावती शहरात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी संचारबंदी लागू करण्यात येत आहे, असं प्रभारी पोलीस आयुक्त संदीप पाटील यांनी सांगितलं.
राजकमल चौकात अचानक जमा झालेल्या जमावाने अचानक दगडफेक सुरू केली. त्यामुळे एकच पळापळ सुरू झाली. नागरिक जीवमुठीत घेऊन सैरावैरा धावत होते. तर दुकानदारांनी घाबरून दुकाने बंद करण्यास सुरुवात केली. जमावाच्या हातात काठ्या आणि दगडं होती. रस्त्यांवरही दगडांचा खच पडला होता. त्यामुळे जमावाला रोखण्यासाठी पोलिसांनी पाण्याचे टँकर मागवले. पोलिसांनी अनियंत्रित जमावाला पांगवण्यासाठी पाण्याचा मारा सुरू केला. तरीही जमाव हटायला तयार होत नव्हता.
पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार केला. अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या त्यानंतर पाण्याचा माराही केला. पण जमाव ऐकायला तयार नव्हता. शेकडो लोक राजकमल चौकात दिसेल त्या दुकानाची तोडफोड करत होते. दिसेल त्याच्या दिशेने दगडफेक करत होते. काही जमावाने तर येथील एका टपरीलाच शिलगावून दिलं. चौबेस नुक्कड कचोरी नावाच्या दुकानाच्या बाजूची टपरीच जमावाने पेटवून देऊन पळ काढला. या आगीत संपूर्ण टपरी जळून खाक झाली आहे.
राजकमल चौकात जमावाने दुकानांवर दगडफेक करतानाच पोलिसांनाही टार्गेट केलं. पोलिसांच्या दिशेने जोरदार दगडफेक केल्याने पोलीसही आक्रमक झाले. पोलिसांनी ही झुंडशाही मोडित काढण्यासाठी दंगेखोरांना पळवून पळवून मारले. लाठीमार करत पोलिसांनी या आंदोलकांना अद्दल घडवली.
तब्बल तासभर पोलीस आणि जमावामध्ये धुमश्चक्री उडाली होती. पोलिसांनी जमावाला रोखण्यासाठी प्रचंड लाठीमार केला. पोलिसांनी जमावाच्या मागे पळत पळत त्यांना धरून बदडले. पोलीसही आक्रमक मोडमध्ये आल्याचं लक्षात येताच जमाव पांगला. तब्बल तासाभराच्या थरार नाट्यानंतर जमाव पांगला गेला.
संबंधित बातम्या:
रजा अकादमीवर बंदी घाला, नाही तर आम्ही त्यांना संपवू, महाराष्ट्रातल्या दंगलीवर राणेंचा इशारा