नंदुरबार – महावितरणने शेतकऱ्यांकडील थकबाकी वसुलीला सुरुवात केली आहे. ज्या डीपीवरील 50 टक्क्यांपेक्षा अधिक शेतकऱ्यांकडे कर्ज असेल, त्या डीपीचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात येत आहे. याचा सर्वाधिक फटका हा ज्या शेतकऱ्यांकडे महावितरणाची थकीबाकी नाही, त्यांना बसताना दिसून येते आहे. पूर्ण डीपीचाच विद्युत पुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे त्यांना देखील आपल्या पिकाला पाणी देता येत नाही. महावितरणच्या या धोरणामुळे वीजबिल भरून देखील पाणी देता येत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच महावितरणने यातून काहीतरी तोडगा काढावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
जिल्ह्यात आता ऊसतोडणी आणि रब्बी हंगामातील पेरणीला सुरुवात झाल्याने, अनेक मजूर रात्री शेतातच मुक्कामाला राहातात. मात्र विद्युत पुरवठा खंडित केल्याने त्यांच्यावर अंधारात राहाण्याची पाळी आली आहे. विद्युत पुरवठा खंडित असल्याने त्यांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी देखील दूरवर जावे लागते. तसेच अंधार असल्यामुळे रात्रीच्यावेळी जंगली श्वापदाच्या हल्ल्याची भीती नाकारता येत नाही. या सर्व अडचणी लक्षात घेऊन विद्युत विभागाने सरसकट विद्युत पुरवठा खंडित करू नये. ज्या ग्राहकांनी वीजबिल भरले नाहीत, त्यांचाच वीज पुरवठा खंडित करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
दरम्यान यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे पीक वाया गेले होते. अति पावसाने पीक खराब झाल्याने शेतकऱ्याला योग्य मोबदला देखील मिळाला नाही. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तर आता गेल्या दोन तीन दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे देखील नुकसान झाले आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याने विद्युत बिल वसुलीतून काहीकाळ सूट देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
संबंधित बातम्या
धक्कादायक: रस्त्यावरील खड्ड्यामुळे हादरे बसल्याने रायफलमधून सुटली गोळी, हिंगोलीत जवानाचा मृत्यू!
Nashik| साहित्य संमेलन होणार दणक्यात; पालकमंत्र्यांसह 6 आमदारांनी दिले 55 लाख रुपये
Nashik| अवकाळी पावसाने द्राक्ष बागांवर संकटाची बरसात; शेतकऱ्यांची झोप उडाली!