जालना : राज्यात कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे ओसरली नसली तर रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. याच कारणामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य लक्षात घेऊन शाळा सुरु कराव्यात का यावर चर्चा करण्यात येत आहे. मात्र, याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे अनुकूल नसल्याचे समोर आले आहे. त्यांनी सध्या शाळा सुरु करु नयेत असं म्हटलं आहे. तसेच सध्या 18 वर्षावरील सर्वांचे लसीकरण केले जात आहे. त्यामुळे महाविद्यालये सुरु करण्यास हरकत नाही, असेही ते म्हणाले आहेत. टोपे रविवारी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली. (Children have high risk of Corona infection should not start school right now said Rajesh Tope)
नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा कमी झाल्यामुळे सध्या निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. याच कारणामुळे आता राज्यातील शाळा सुरु करण्यात याव्यात अशी मागणी काही पालकांकडून केली जात आहे. राज्यात शाळा सुरु करण्यासाठी शिक्षण विभागाने पालकांची मते जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण चालू केले होते. या सर्वेक्षणात अनेक पालकांनी शाळा सुरू कराव्यात असे दर्शवले होते. मात्र, राजेश टोपे यांनी सध्याच शाळा सुरु करणे योग्य होणार नसल्याचे म्हटले आहे. अजूनही लहान मुलांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण झालेले नाही. त्यामुळे त्यांना कोरोनाच्या प्रादुर्भावाचा धोका जास्त आहे, असं मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलं आहे. तसेच 18 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या मुलांचे लसीकरण होत असल्याने महाविद्यालय सुरू करण्यास हरकत नसल्याचेही राजेश टोपे यांचे मत आहे.
दरम्यान, कोरोना महामारीच्या तिसऱ्या टप्प्यातील निर्बंधाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी राजेश टोपे यांनी चर्चा केली. यामध्ये निर्बंध एक तर कडक ठेवले पाहिजेत नाहीतर सुटच दिली पाहिजे, अशी मागणी राजेश टोपे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. तसेच ही मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनादेखील मान्य असल्याची माहिती टोपे यांनी दिलीय.
इतर बातम्या :
कोकण, मध्य महाराष्ट्रासाठी पुढील पाच दिवस पावसाचा ‘रेड अॅलर्ट’; मुंबईत चार दिवस ‘ऑरेंज अॅलर्ट’
अभूतपूर्व! हरलीनने टिपलेल्या झेलाचे मोदींकडूनही कौतुक, इन्स्टाग्राम स्टोरीतून केलं अभिनंदन
(Children have high risk of Corona infection should not start school right now said Rajesh Tope)