मुंबई: पुरामुळे ज्यांचं शेती, घरदार आणि दुकानांचं नुकसान झालं आहे. त्या सर्वांना तातडीने मदत केली जाईल. माझ्याकडे दोन-चार दिवसात आर्थिक नुकसानीचा अहवाल येणार आहे. अहवाल आल्यावर सर्वंकष मदत केली जाईल, असं सांगतानाच सवंग लोकप्रियतेसाठी कोणतीही घोषणा करणार नाही. कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिलं. (Cm uddhav thackeray assures to full relief flood affected people in maharashtra)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूणमधील पूरपरिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली. आपण हवामान बदल हा शब्द ऐकून होतो, आता त्याचा फटका बसू लागला आहे. काल मी तळीये गावात गेलो होतो. दरडी कोसळायला लागल्या आहेत. वर्षानुवर्षे असलेल्या गावांवर दरडी कोसळत आहेत. क्षणार्धात या दरडीखाली लोक दबून जात आहे. आताचा पाऊस पडला त्याला अतिवृष्टी म्हणता येत नाही. हा भयानक पाऊस होता. हे आता सातत्याने होत आहे. पावसाची सुरुवात चक्रीवादळाने होत असते. नंतर अचानक कुठे तरी ढगफुटी होते. पूर येतो. जीवितहानी होते. पिकांचं नुकसान होतं. विध्वंस होतो सगळीकडे. हे दरवर्षी होत आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी मी आत्ता लगेच काहीतरी घोषणा करणार नाही, राज्यातील पूर परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊन त्यानंतरच नुकसानभरपाई संदर्भामध्ये जाहीर करण्यात येईल, तसेच केंद्राकडून देखील काय आणि किती मदत मागायची ते ठरवता येईल, असं ते म्हणाले. तात्काळ मदत केली जाईल. त्यांच्या अंगावर जेवढे कपडे आहेत तेवढेच कपडे त्यांच्याकडे आहेत. घरातील धनधान्य वाहून गेले आहेत. त्यामुळे त्यांना सर्वात आधी त्याबाबतची मदत दिली जाणार आहे. तिथे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त आहेत. त्यांना तशा सूचना दिलेल्या आहेत. आर्थिक मदत सुद्धा करू. उद्या फक्त एक आढावा येऊ द्या. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सांगली, सातारा यांचा एकत्रिच आढावा घेऊन तात्काळ मदत घोषित करू, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
रस्ते वाहून गेले आहेत. काही ठिकाणी पूल वाहून गेले आहेत. मोठं नुकसान झालं आहे. पिकांचं नुकसान झालं आहे. सर्वांचा एकत्रित आढावा घेऊन जे शक्य होईल जे आवश्यक आहे ते सगळे पुरवले जाईल. ज्यांचा विमा आहे. त्यांना कोणत्याही अडचणी येऊ देणार नाही. तांत्रिक मुद्दे उपस्थित होऊ दिले जाणार नाहीत. मी त्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. ज्यांनी विमाकवच घेतलं नसेल त्यांनाही मदत करा. यामध्ये तांत्रिक अडचणी येणार नाहीत, याकडे लक्ष द्या, अशी सूचना दिलेली आहे, असं त्यांनी सांगितलं.
वारंवार येणारी संकटांची मालिका आणि संकटं बघितल्यानंतर आता प्रत्येक जिल्ह्यात एनडीआरएफ सारखी टीम उभारण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. कारण बाहेरची टीम येईल तोपर्यंत इथली टीम मदत कार्याला लागेल. मी हवाईदलाच्या हेलिकॉप्टरने आलो. मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर आहे ना, मग या हेलिकॉप्टरने का आलो? कारण हवामान. काल मी तळीये गावात गेलो. तिथेही पाऊस सुरु झाला होता. अशा हवामानात एनडीआरएफची टीम किंवा इतर टीम पोहोचल्या पाहिजेत. काही ठिकाणी दरडी कोसळल्या त्याठिकाणी माणसं जाऊ शकत होती. पण यंत्रसामग्री नेणं कठीण होतं. तिथे रस्तेच नव्हते. रस्ते साफ करुन तिथे यंत्रसामग्री पोहोचवण्याचा प्रयत्न केल्याने तिथे दुर्देवाने टीमला पोहोचायला वेळ लागला, असं त्यांनी स्पष्ट केलं.
उद्या पश्चिम महाराष्ट्राचा दौरा आहे. माझ्यासोबत मुख्य सचिवही आले आहेत. काम सतत चालू आहे. दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोन होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, तसेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचाही फोन येऊन गेला. त्यांनी एनडीआरएफ, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स जे आवश्यक असेल ते सर्व देण्याचं आश्वासन दिलं. आता दूरगामी योजना आपण लागू करणार आहोत त्यासाठी त्यांची मदत आपल्याला लागेल. कोरोनामुळे सर्वांची आर्थिक परिस्थिती आणि अर्थव्यवस्था मंदावलेली आहे. त्यामध्ये संकटातून संकट येत आहेत. या संकटसमयी केंद्राकडूनही मदत होत आहे. आज मी त्यांच्याकडे एवढे हजार कोटी द्या, अशी मागणी करणार नाही. आपण वस्तुस्थितीवर आधारीत मागणी करू. सर्व परिस्थितीचा आढावा घेतल्यावर मागणी करु. पण आता तात्काळ महाराष्ट्र सरकारकडून जी मदत लागेल ती केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं. (Cm uddhav thackeray assures to full relief flood affected people in maharashtra)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 25 July 2021 https://t.co/86BidTxNg0 #News #bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 25, 2021
संबंधित बातम्या:
VIDEO: काही पण करा, आमदार, खासदाराचा दोन महिन्याचा पगार फिरवा, महिलेचा मुख्यमंत्र्यांकडे टाहो
(Cm uddhav thackeray assures to full relief flood affected people in maharashtra)