पंढरपुरात पोहोचताच मुख्यमंत्र्यांची बैठक, संभाव्य तिसऱ्या लाटेत जबाबदारीने काम करण्याच्या सूचना

| Updated on: Jul 20, 2021 | 12:16 AM

यापुढेही संभाव्य तिसऱ्या लाटेत जबाबदारीने काम करून कोरोनाचा मुकाबला करूया, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (19 जुलै) येथे व्यक्त केली.

पंढरपुरात पोहोचताच मुख्यमंत्र्यांची बैठक, संभाव्य तिसऱ्या लाटेत जबाबदारीने काम करण्याच्या सूचना
UDDHAV THACKERAY
Follow us on

पंढरपूर : कोरोना महामारीच्या साथीत आपल्या जीवाची पर्वा न करता सर्व यंत्रणा काम करत आहेत. या साऱ्यांच्या कामाचा परिपाक म्हणून आपण या महामारीवर मात करीत आहोत. या कामाचे सर्व श्रेय तुमचे आहे. यापुढेही संभाव्य तिसऱ्या लाटेत जबाबदारीने काम करून कोरोनाचा मुकाबला करूया, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (19 जुलै) येथे व्यक्त केली. (CM Uddhav Thackeray called meeting in Pandharpur instructs officers to work responsibly to fight Corona third wave)

आषाढी वारीनिमित्त शासकीय महापूजेनिमित्त मुख्यमंत्री  ठाकरे यांचे मुंबईहून वाहनाने पंढरपुरात आगमन झाले. लांबचा प्रवास असूनही मुख्यमंत्र्यांनी विश्रांती न घेता शासकीय विश्रामगृह येथे पोहचताच बैठक घेऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, माहिती व जनसंपर्क महासंचालक तथा सचिव डॉ. दिलीप पांढरपट्टे,जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सोलापूर महापालिका आयुक्त पि.शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव आदी उपस्थित होते.

टेस्टिंग आणि ट्रिटमेंटवर भर द्या. नागरिकांच्या लसीकरणाला प्राधान्य द्या

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. ही समाधानाची बाब आहे. प्रशासन, आरोग्य विभागाने पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत उल्लेखनीय काम केले आहे, मात्र संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत सतर्कता बाळगा. जिल्ह्यात टेस्टिंग आणि ट्रिटमेंटवर भर द्या. नागरिकांच्या लसीकरणाला प्राधान्य द्या. ऑगस्ट, सप्टेंबरपासूनज लसीचा पुरवठा सुरळित होईल. ऑक्सिजनची उपलब्धता आणि लागणारी गरज याचे योग्य नियोजन करा. ऑक्सिजनचा अधिक साठा करण्यावर भर द्यावा. अर्थचक्र थांबू नये म्हणून कोरोनाचे नियम पाळून उद्योग-धंदे सुरू आहेत. कामगारांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी त्यांच्या आरटीपीसीआर चाचण्या तसेच खासगी दवाखान्यातून लस घेण्यास परवानगी दिली असल्याने उद्योगांनी कर्मचाऱ्यांच्या लसीकरणावर अधिकाधिक भर द्यावा.

इंजेक्शनची कमतरता पडणार नाही, याचीही काळजी घ्या

तसेच ठाकरे यांनी औषधाचा पुरेसा साठा, इंजेक्शनची कमतरता पडणार नाही, याचीही काळजी घेण्याच्या सूचना  केल्या.  कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत शास्त्रज्ञांनी लहान मुलांना धोका असल्याची शक्यता वर्तवली आहे. याबाबत त्यांच्या उपचारासाठी आवश्यक हॉस्पिटलची निर्मिती, त्यांच्यासाठी लागणाऱ्या औषधांचा साठा उपलब्ध करून ठेवा, असेही ठाकरे म्हणाले.

सोलापूरच्या पाण्याचा विषय मार्गी लावणार

पालकमंत्री भरणे यांनी सोलापूरच्या पाणीपुरवठ्यासाठी उजनी दुहेरी पाईपलाईनसाठी अजून 103 कोटी रूपयांची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगितले. यावर मुख्यमंत्री  ठाकरे यांनी पाण्याचा विषय मार्गी लावण्याची ग्वाही दिली. तसेच पुढे बोलताना यावेळी पोलीस आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी पंढरपूरमध्ये ऑक्सिजन आणि आयसीयू 60 बेडचे रूग्णालय सुरू केल्याची माहिती श्रीमती सातपुते यांनी दिली. पोलीस विभागासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी मागणी केली. पोलीस विभागाच्या मागणीचा प्राधान्याने विचार करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देऊ, असे मुख्यमंत्री  ठाकरे यांनी सांगितले.

महिनाभरात कोरोना रूग्ण नसणाऱ्या गावात 6 वी ते 12 वीचे वर्ग सुरू केल्याची माहिती स्वामी यांनी दिली. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी झाडाखाली, पारावर शाळा सुरू केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

इतर बातम्या :

आधी सिंघम म्हणून ओळख आता तामिळनाडू भाजपचे सर्वात तरुण प्रदेशाध्यक्ष, माजी IPS अधिकारी के. अन्नामलाई आहेत तरी कोण ?

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती, प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा यांना अटक, कारण काय?

मोठी बातमी ! पंढरपुरात अखेर 300 वारकऱ्यांना परवानगी, विसाव्यापासून मठापर्यंत मानाच्या पालख्या पायी जाणार

(CM Uddhav Thackeray called meeting in Pandharpur instructs officers to work responsibly to fight Corona third wave)