रत्नागिरी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज चिपळूणच्या दौऱ्यावर आहेत. दोन दिवसांपूर्वी चिपळूणला मुसळधार पावसाने झोपडलं. घराघरांमध्ये पाणी शिरलं. संपूर्ण शहर ठप्प झालं. पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आज चिपळूणला गेले. त्यांनी तिथे स्थानिकांची भेट घेतली. यावेळी हताश झालेल्या स्थानिकांनी मुख्यमंत्र्यांपुढे व्यथा मांडल्या. चिपळूणची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मदतीचं आश्वासन दिलं. तसेच लोकप्रियतेसाठी कोणत्याही पॅकेजची घोषणा करणार नाही. कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
राज्यात गेल्या तीन ते चार दिवसात पावसामुळे भयानक परिस्थिती निर्माण झाली. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, कोल्हापूर या राज्यांना पावसाचा प्रचंड फटका बसला. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या. या काळात केंद्र सरकारने काही मदत केली का? असा प्रश्न काही पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारही मदत करत असल्याचं सांगितलं.
“दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोन होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, तसेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचाही फोन येऊन गेला. त्यांनी एनडीआरएफ, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स जे आवश्यक असेल ते सर्व देण्याचं आश्वासन दिलं. आता दूरगामी योजना आपण लागू करणार आहोत. त्यांच्यासाठी त्यांची मदत आपल्याला लागेल. कोरोनामुळे सर्वांची आर्थिक परिस्थिती आणि अर्थव्यवस्था मंदावलेली आहे. त्यामध्ये संकटातून संकट येत आहेत. या संकटसमयी केंद्राकडूनही मदत होत आहे. आज मी त्यांच्याकडे एवढे हजार कोटी द्या, अशी मागणी करणार नाही. आपण वस्तुस्थितीवर आधारीत मागणी करु. सर्व परिस्थितीचा आढावा घेतल्यावर मागणी करु. पण आता तात्काळ महाराष्ट्र सरकारकडून जी मदत लागेल ती केली जाईल”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
“बाधितांना तात्काळ मदत केली जाईल. सध्या त्यांच्या अंगावर जेवढे कपडे आहेत तेवढेच कपडे त्यांच्याकडे आहेत. घरातील धनधान्य वाहून गेले आहे. त्यामुळे त्यांना सर्वात आधी त्याबाबतची मदत दिली जाणार आहे. तिथे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त आहेत. त्यांना तशा सूचना दिलेल्या आहेत. आर्थिक मदत सुद्धा करु. उद्या फक्त एक आढावा येऊ द्या. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सांगली, सातारा यांचा एकत्रिच आढावा घेऊन तात्काळ मदत घोषित करु. रस्ते वाहून गेले आहेत. काही ठिकाणी पूल वाहून गेले आहेत. मोठं नुकसान झालं आहे. पिकांचं नुकसान झालं आहे. सर्वांचा एकत्रित आढावा घेऊन जे शक्य होईल जे आवश्यक आहे ते सगळे पुरवले जाईल”, असं मुख्यमंत्री म्हणाले.
“मदतीसाठी तांत्रिक मुद्दे उपस्थित होऊ दिले जाणार नाहीत. मी त्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. ज्यांनी वीमाकवच घेतलं नसेल त्यांनाही मदत करा. यामध्ये तांत्रिक अडचणी येणार नाहीत, याकडे लक्ष द्या, अशी सूचना दिलेली आहे”, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
“वारंवार येणारी संकटांची मालिका आणि संकटं बघितल्यानंतर आता प्रत्येक जिल्ह्यात एनडीआरएफ सारखी टीम उभारण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. कारण बाहेरची टीम येईल तोपर्यंत इथली टीम मदत कार्याला लागेल. मी हवाईदलाच्या हेलिकॉप्टरने आलो. मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर आहे ना, मग या हेलिकॉप्टरने का आलो? कारण हवामान. काल मी तळयीगावात गेलो. तिथेही पाऊस सुरु झाला होता. अशा हवामानात एनडीआरएफची टीम किंवा इतर टीम पोहोचल्या पाहिजेत. काही ठिकाणी दरडी कोसळल्या त्याठिकाणी माणसं जाऊ शकत होती. पण यंत्रसामग्री नेणं कठीण होतं. तिथे रस्तेच नव्हते. रस्ते साफ करुन तिथे यंत्रसामग्री पोहोचवण्याचा प्रयत्न केल्याने तिथे दुर्देवाने टीमला पोहोचायला वेळ लागला”, असं मुख्यमंत्री म्हणाले.
संबंधित बातमी :
लोकप्रियतेसाठी कोणतीही घोषणा करणार नाही, कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन