कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे उद्या 29 जुलैला पूरग्रस्त कोल्हापूर (Kolhapur Rains) भागाचा दौरा करणार आहेत. कोकणसह पश्चिम महाराष्ट्राला पावसाने झोडपून काढल्याने हाहाकार उडवला. महापुरामुळे अनेक जिल्ह्यात मोठं नुकसान झालं आहे. मुख्यमंत्र्यांनी कोकणातील तळीये, चिपळूण या भागाचा दौरा केला होता. त्यानंतर आता ते कोल्हापूरचा दौरा करणार आहेत. यावेळी उद्धव ठाकरे कोल्हापूर शहर, शिरोळ तालुक्याला भेट देणार आहेत.
नुकतंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सांगली, सातारा आणि कोल्हापूरचा दौरा केला. अजित पवार यांनी या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यातील पूरस्थिती आणि नुकसानीची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. तसेच राज्याचं पुरामुळे झालेलं नुकसान आणि पूरग्रस्तांना द्यावयाची मदत यावरही चर्चा झाल्याची माहिती आहे.
दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर जाऊन पाहणी करणार आहेत. खराब हवामानामुळे मुख्यमंत्री ज्या सातारा जिल्ह्यातील कोयनानगर परिसरात जाऊ शकले नव्हते, त्या गावात देवेंद्र फडणवीस जाण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस आज साताऱ्यातील मोरगिरी/आंबेघर येथे पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर दुपारी 4.30 वाजता कोयनानगर येथे स्थलांतरित कुटुंबाची भेट घेणार. त्यानंतर सायं. 5.15 : हुंबरळी ता. पाटण येथे अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.
महापुरामुळे कोल्हापूर जिल्ह्यात शेतीचं सुमारे 66 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पुरामुळे 58 हजार 500 हेक्टर जमिनीवरील पिके बाधित झाली आहेत. करवीर, शिरोळ आणि हातकणंगले या तालुक्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. ऊस, भात, सोयाबीन भुईमूग पिकांना सर्वाधिक नुकसान झालं आहे. शेतातील पाणी कमी झाल्यानंतरच पंचनामे केले जाणार आहेत.
कोल्हापूर मिरज रेल्वे मार्गावरील भराव वाहून गेला आहे. पुराचे पाणी ओसारल्याने ठिक ठिकाणी भराव वाहून गेल्याचे चित्र आहे. भराव वाहून गेल्याने पुढील काही दिवस मिरज-कोल्हापूर रेल्वेसेवा बंद राहणार आहे. एक किलोमीटरवरील भराव वाहून गेला आहे. पुलाचे स्ट्रक्टचरल ऑडिट झाल्यानंतर सेवा सुरळीत होणार आहे.
राज्यात महापूर आणि दरड कोसळल्यामुळे राज्यातील 8 जिल्ह्यात सहा हजार कोटींचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे नुकसानग्रस्तांना पॅकेजच्या रुपाने भरपाई देण्यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. (Flood, rain losses put at Rs 6,000 crore in maharashtra) राज्यातील 8 जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदतीसाठी अंदाजे 6 हजार कोटी रुपयांची गरज आहे. पुरामुळं कोकणातल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि विदर्भातील अकोला आणि अमरावतीमध्ये मोठं नुकसान झालं आहे. एकूण सहा हजार कोटींचं हे नुकसान झाल्याचा सरकारचा प्राथमिक अंदाज आहे.
संबंधित बातम्या
दरड आणि पुरामुळे राज्यात 6 हजार कोटींच्या नुकसानीचा अंदाज; पॅकेजसाठी हालचाली सुरू
उद्धव ठाकरे म्हणाले, ‘वाढदिवसाची भेट काय देणार?’, भास्कर जाधवांकडून ‘स्वच्छ-सुंदर’ उत्तर!