चंद्रपूर : शहरातील मध्यवर्ती आझाद बगीच्याच्या (Central Azad Bagicha) उद्घाटन प्रसंगी प्रोटोकॉलच्या मुद्दयावर काल रात्री अभूतपूर्व गोंधळ बघायला मिळाला. चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार ( Independent MLA Kishor Jorgewar) आणि मनपात सत्ताधारी भाजप कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात जोरदार नारेबाजी केली आणि गोंधळ घातला. आझाद बगीच्याच्या उद्घाटनावरून दोन दिवसांपासूनच चंद्रपूरचे राजकीय वातावरण तापलं होतं. कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार आणि आमदाराला आमंत्रित न केल्याचा आरोप करत हा कार्यक्रम उधळून लावण्याच्या वल्गना विरोधकांकडून करण्यात आल्या. गोंधळाच्या पार्श्वभूमीवर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात (Tight police security deployed) करण्यात आला होता. कार्यक्रमात वादाचे पडसाद दिसले. आमदार जोरगेवार यांच्या आगमनाआधीच बगीच्याचं उद्घाटन करण्यात आलं.
कार्यक्रमाच्या मंचावर आमदार जोरगेवार आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यात जोरदार वाकयुध्द झालं. आणि या गोंधळात आणखीच भर पडली. अखेर आमदार जोरगेवार यांनी आपला अपमान झाल्याचा आरोप करत कार्यक्रमावर बहिष्कार घातला. तर दुसरीकडे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मनपा आयुक्त राजेश मोहिते यांनी हा प्रोटोकॉलचा गोंधळ घडवून आणल्याचा आरोप केलाय.
मी या भागाचा आमदार असून मला कार्यक्रमाला का बोलावलं नाही, असा आरोप अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी केला. या ठिकाणी मी येण्यापूर्वीच कार्यक्रम आटोपण्यात आला. हा आमदाराचा अपमान आहे. लोकप्रतिनिधी म्हणून मला निवडून दिलेल्या लोकांचा अपमान आहे, असा आरोप जोरगेवार यांनी केला. प्रोटोकॉलचं पालन करणं हा मनपा आयुक्तांच काम आहे. त्यांनी ते केलं नसल्यानं गोंधळ उडाल्याचं स्पष्टीकरण भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केलंय.