नांदेड : राज्यात ओमिक्रॉन या कोरोना विषाणूच्या नव्या रुपाचे संकट विस्तारताना दिसत आहे. राज्यात ओमिक्रॉनचा संसर्ग वाढत असून वेगवेगळ्या जिल्ह्यात रुग्ण आढळत आहेत. अकोला, औरंगाबाद जिल्ह्यात ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळल्यानंतर आता मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातदेखील ओमिक्रॉनचा शिरकाव झाला आहे. येथे दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या तिघांपैकी दोन जणांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे. या रुग्णांवर सध्या उपचार करण्यात येत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हिमायतनगर येथे मागील आठवड्यात तिघे जण दक्षिण आफ्रिकेतून आले होते. खबरदारी म्हणून या तिघांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. तसेच त्यांच्या स्वॅबचे नमुने जिनोम सिक्वेंसिंगासाठी पुणे येथे पाठवण्यात आले होते. दरम्यान तिघांपैकी दोघे ओमिक्रॉन पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती येथील आरोग्य विभागाने दिलीय.
मागील काही दिवसांपासून राज्यात ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहेत. काल म्हणजेच 26 डिसेंबर रोजी अकोला जिल्ह्यात एका महिलेला ओमिक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. ही महिला काही दिवसांपूर्वी दुबईतून परतली होती. तर दुसरीकडे औरंगाबाद जिल्ह्यातदेखील 25 डिसेंबर रोजी दोघांचा ओमिक्रॉन अवहाल पॉझिटिव्ह आला होता.
तर दुसरीकडे कोविडचा संसर्ग वाढत असून तो रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग अधिक वाढविण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. आपल्याला अधिक दक्षता बाळगून काटेकोर पाऊले उचलावी लागणार आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. टास्क फोर्सची बैठकही येत्या एक दोन दिवसांत आयोजित करावी असेही त्यांनी निर्देश त्यांनी दिले आहेत.
आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाढत्या संसर्गावर चिंता व्यक्त करण्यात आली. यावेळी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी आपल्या सादरीकरणात जानेवारीच्या मध्याला कोविडच्या सक्रिय रुग्णात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली असून लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज आहे असे सांगितले. काही दिवसांपूर्वी आपण दिवसाला 8 लाख डोसेस देत होतो, सध्या 5 लाख डोसेस दिवसाला दिले जातात. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व पालकमंत्र्यांनी पाठपुरावा करून आपापल्या जिल्ह्यांत लसीकरण वेगाने होईल असे पाहण्याचे निर्देश दिले.
डॉ. व्यास यांनी अधिक माहिती देताना सांगितले की 8 डिसेंबर रोजी 6200 सक्रिय रुग्ण होते. मात्र आज 10 हजार सक्रिय रुग्ण आहेत. एकूणच गेल्या 20 दिवसांत सक्रिय रुग्णांत 50 टक्के वाढ झाली असून मागील सहा दिवसांत रुग्णांच्या संख्येत तिपटीने वाढ होत आहे. राज्यात पॉझिटिव्हिटी रेट 1.06 टक्के झाल्याचेही व्यास यांनी सांगितले.
इतर बातम्या :