रत्नागिरी : आज येईल, उद्या येईल म्हणून सर्वांचेच डोळे मान्सूनकडे लागलेले होते. मान्सून जूनच्या दुसऱ्या आठवड्यात येण्याची शक्यताही वर्तवण्यात आली. मात्र, आता मान्सूनबाबत मोठी अपडेट आली आहे. यंदा मान्सूनचा पारंपारिक मुहूर्त हुकला आहे. पावसाचं उशिरा आगमन होणार असल्याने आता शेतकऱ्यांना पेरण्यांसाठी थोडं थांबावं लागणार आहे. वळवाचा पाऊसही यंदा वेळेवर झाला नाही. त्यामुळे आधीच शेतकरी चिंतेत होते. आता पुन्हा एकदा पाऊस लांबल्याने शेतकरी अधिक चिंताग्रस्त झाले आहेत.
वादळाच्या शक्यतेने यंदा मान्सूनचा पारंपारिक मुहूर्त हुकला आहे. वळवाच्या पावसाने फसवले आता मान्सून देखील लांबण्याची शक्यता आहे. आजपासून मृग नक्षत्र, मृगाच्या मुर्हूतावर येणाऱ्या पावसाने हुलकावणी दिली आहे. रत्नागिरीतील हवेतील आद्रता 65 टक्यांवर गेली आहे. जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ हवामान आहे. आभाळात ढगांची दाटीवाटी झाली आहे. आज मान्सून पूर्व पावसाचा हवामान खात्याचा अंदाज आहे. पण पाऊस पडणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. चक्रीवादळामुळे मान्सून 15 जूननंतर राज्यभर सक्रिय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
खोल समुद्रात चक्रीवादळ असल्याने मुंबईसह कोकण किनारपट्टीवर पावसाची फार शक्यता नाही. अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाल्याची माहिती आहे. गेल्या तीन तासांत या चक्रीवादळाचा वेग हा 11 किलोमीटर प्रतितास इतका झाला आहे. हे चक्रीवादळ आता उत्तरेच्या दिशेने पुढे सरकत असल्याची माहिती आहे. जसं जसं हे चक्रीवादळ पुढे सरकेल तसा पुढील 12 तासात त्याचा वेग आणखी वाढेल, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
चक्रीवादळ खोल समुद्रात असल्याने मुंबईसह कोकण किनारपट्टीवर फार पावसाची शक्यता नाही, असंही हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. तरी, चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मच्छिमारांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. मच्छिमारांनी खोल समुद्रात मच्छिमारीसाठी जाऊ नये, असं आवाहन करण्यात आलं आहे. काही जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात 4 जिल्ह्यांना हा अलर्ट देण्यात आला आहे. पुढील 3 ते 4 तासात जळगाव, नाशिक, अहमदनगर, छ. संभाजीनगर या जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह वादळी पावासाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे
पूर्वमध्य आणि लगतच्या आग्नेय अरबी समुद्रावर संध्याकाळी चक्रीवादळ “बिपोरजॉय” निर्माण झाले आहे. ते उत्तरेकडे सरकण्याची आणि पुढील 24 तासांत पूर्वमध्य अरबी समुद्रात तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता, असल्याचं हवामान खात्याचे अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी ट्विटद्वारे स्पष्ट केलं आहे.
नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहामध्ये फक्त 27 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने नाशिककरांची चिंता वाढली आहे.. लांबणीवर पडलेला मान्सून आणि अलनिनो वादळामुळे पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. त्यातच आता गंगापूर धरणातील पाणीसाठा देखील कमी होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.. परिणामी आठवड्यातून एक दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय प्रशासन घेऊ शकते असं चित्र सध्या आहे.