Maharashtra Kesari | मानाची चांदीची गदा, स्कॉर्पिओ एन, 25 बुलेट गाड्या बक्षीस, महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार धाराशिवमध्ये रंगणार

| Updated on: Oct 23, 2023 | 11:42 PM

धाराशिवमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेत माती 20 आणि मॅट 20 असे वेगवेगळे 40 गट सहभागी होणार आहेत. या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (23 ऑक्टोबर) धाराशिवमध्ये महत्त्वाच्या घडामोडी घडल्या.

Maharashtra Kesari | मानाची चांदीची गदा, स्कॉर्पिओ एन, 25 बुलेट गाड्या बक्षीस, महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार धाराशिवमध्ये रंगणार
Follow us on

संतोष जाधव, Tv9 मराठी, धाराशिव | 23 ऑक्टोबर 2023 : 65 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा धाराशिवमध्ये संपन्न होणार आहे. या स्पर्धेच्या मैदानाचा भूमिपूजन अर्थात आखाडा पुजन सोहळा जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यासह रुस्तम ए हिंद, महाराष्ट्र केसरी आणि ज्येष्ठ कुस्तीपटू यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी पैलवान, पंच यांना देण्यात येणाऱ्या ट्रॅक सूटचे अनावरण करण्यात आले. 16 ते 20 नोव्हेंबर या काळात या स्पर्धा होणार आहेत.

लाल माती आणि मॅट या 2 गटात या स्पर्धा होणार असून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेच्या पदाधिकारी आणि कुस्ती पैलवान यांच्या हस्ते भूमीपुजन करण्यात आले. 5 दिवस या स्पर्धा चालणार आहेत. यात विजेत्यांना मानाची चांदीची गदा, सकार्पियो, 25 बुलेट, रोख रक्कम अशी 2 कोटींची बक्षिसे दिली जाणार आहेत.

950 मल्ल भाग घेणार

कुस्ती खेळाडू आणि कुस्ती प्रेमीसाठी महाराष्ट्र केसरी हा एक प्रकारचा कुंभ मेळा असतो. या स्पर्धेचे देशात आकर्षण असते. धाराशिव शहरातील तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम येथे या स्पर्धा होणार आहेत. माती 20 आणि मॅट 20 असे वेगवेगळे 40 गट सहभागी होणार आहेत. 950 मल्ल भाग घेणार आहेत. या स्पर्धेतील विजेत्यांसाठी स्कॉर्पिओ एन आणि 1 लाख, 20 बुलेट अशी बक्षिसे असणार आहेत.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, धाराशिव जिल्हा तालीम संघ, सुधीर अण्णा पाटील मित्र परिवार, हातलाई कुस्ती संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार आहे. यावेळी आयोजक सुधीर पाटील,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे,बाळासाहेब शिंदे,संजय दुधगावकर,नवनाथ जगताप,भाऊसाहेब उंबरे, अनिल काळे, आदित्य पाटील, अभिराम पाटील आदी मान्यवर उपस्थितीत होते.

यावेळी अर्जुनवीर काकासाहेब पवार, राहुल आवारे, रुस्तम हिंद अमोल बचूडे, अमोल भराटे,महाराष्ट्र केसरी दत्ता गायकवाड, राहुल काळभोर,विकी बनकर, चंद्रहास लिमगिरे, रावसाहेब मगर, भरत मेकाले, डबल महाराष्ट्र केसरी बाळासाहेब पडघम, उप महाराष्ट्र केसरी मारुती विठ्ठलकर,परिषदेचे धवलसिंह मोहीते पाटील, काळासाहेब पवार, विजय भराटे याचा सत्कार करण्यात आला.