मुंबई : गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयाच्या जागेवर अद्ययावत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार असून वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी गुरुवारी या प्रस्तावाला तत्वतः मंजुरी दिली. आगामी शैक्षणिक वर्षात वैद्यकीय पदवीची पहिली बॅच सुरू करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे. नगरविकास तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी गुरुवारी बैठकीचे आयोजन केले होते.
गडचिरोली जिल्हा हा नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यातील नागरिकांना उत्तम वैद्यकीय सोयी सुविधा मिळाव्यात, तसेच येथील स्थानिक आदिवासी मुलांना तिथेच वैद्यकीय उच्चशिक्षण घेण्याची संधी मिळावी, यासाठी गडचिरोली जिल्हा रुग्णालयाच्या जागी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची आग्रही मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. जिल्ह्यात नक्षलवादी हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांवर उपचार करण्यासाठी अनेकदा त्यांना हेलिकॉप्टरने नागपूरला हलवावे लागते. यात बराच वेळ खर्ची पडत असल्याने या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय उभे राहिल्यास अनेक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देता येतील, अशी त्यामागची त्यांची भूमिका आहे.
आज झालेल्या बैठकीत गडचिरोली जिल्ह्याची ही गरज लक्षात घेत वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी हे महाविद्यालय सुरू करण्याला तत्वतः मंजुरी दिली. त्यासोबतच महाविद्यालयात शिकवण्यासाठी लागणारा स्टाफ उपलब्ध होण्यात येणाऱ्या संभाव्य अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे अश्वासन दिले. तसेच, जिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून अनेक नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यास देखील सांगितले. वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी लागणाऱ्या या प्राथमिक गरजा पूर्ण झाल्यास आगामी शैक्षणिक वर्षांपासून गडचिरोलीमध्ये पदवीची पहिली बॅच सुरू करण्याची तयारी त्यांनी दर्शवली.
याबाबत मंत्री शिंदे यांनीही हे विभाग जिल्हा रुग्णालयात सुरू करण्यासाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देऊ, तसेच नागपूरमधील डॉक्टरांना गडचिरोलीमध्ये काम करण्यासाठी अतिरिक्त इंसेंटिव्ह देण्याबाबत निर्णय घेऊ, असे देशमुख यांना आश्वस्त केले. गडचिरोली जिल्ह्यात वैद्यकीय रुग्णालय खाजगी अथवा पीपीपी स्वरूपात करता येणे शक्य नसल्याने ही जबाबदारी शासनानेच उचलावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती करणार असल्याचे देखील शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. आज पार पडलेल्या या बैठकीला गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजय मीना, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रुडे, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय आणि इतर अधिकारी उपस्थित होते. (Eknath Shinde’s initiative to set up a government medical college in Gadchiroli district)
इतर बातम्या
काय सांगता? नागपूरच्या धर्तीवर औरंगाबादेत तीन मजली उड्डाणपूल, नितीन गडकरींचं वक्तव्य