बुलढाणा: एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या आमदारांसह गुवाहाटीला कामाख्या देवीचं दर्शन घेण्यासाठी गेले आहेत. तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आसूड बुलढाण्यात कडाडणार आहे. उद्धव ठाकरे हे बुलढाण्यात शेतकरी संवाद मेळाव्याला संबोधित करणार आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतरची उद्धव ठाकरे यांची ही मुंबई बाहेरची पहिलीच सभा आहे. त्यामुळे या सभेकडे राज्यातील जनतेचं लक्ष लागलं आहे. तसेच उद्धव ठाकरे या दौऱ्यात मराठा नेते पुरुषोत्तम खेडेकर यांचीही भेट घेणार असल्याने या भेटीकडेही सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.
आज बुलढाण्यात शेतकरी संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्याला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत. उद्धव ठाकरे दुपारी 1:15 मिनिटांनी औरंगाबादेत दाखल होतीलय. त्यानंतर ते चिखली येथे सभास्थळी निघतील. वाटेत ते देऊळगाव राजाला थांबणार आहेत. क्षणभर विश्रांतीसाठी ते देऊळगाव राजाला थांबणार आहेत.
त्यानंतर चिखली सभास्थळापासून नजीक असलेल्या स्वरांजली हॉटेलात थांबणार आहेत. सायंकाळी 5:30 ते 6 च्या दरम्यान उद्धव ठाकरे यांचं भाषण होणार आहे.
सभेनंतर किंवा दुपारीच उद्धव ठाकरे मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांच्या घरी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेणार आहेत. याआधीच काही मराठा संघटनांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि पुरुषोत्तम खेडेकर यांच्या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या भेटीत उद्धव ठाकरे आणि खेडेकर यांच्यात काय चर्चा होते? याचीही सर्वांना उत्सुकता लागली आहे.
येत्या 12 जानेवारी रोजी सिंदखेड राजा येथे जिजाऊ जन्मोत्सवाचं आयोजन केलं जाणार आहे. या सोहळ्याला उद्धव ठाकरे यांनी उपस्थित राहण्याचं त्यांना आमंत्रण दिलं जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक विधान केलं होतं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवप्रेमींसह सर्वांना एकत्र येऊन राज्यपालांचा निषेध नोंदवण्याचं आवाहन केलं होतं.
त्यामुळे आजच्या भाषणात उद्धव ठाकरे राज्यपालांवर हल्लाबोल करणार असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे. याशिवाय शिंदे गटाचे आमदार आणि खासदार गुवाहाटीला गेले आहेत. या दौऱ्याचाही उद्धव ठाकरे समाचार घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ज्या जिल्ह्याचे नाव जिजाऊसाठी घेतले जातेय. त्या जिल्ह्यात आज उद्धव ठाकरे येत आहेत. महाराष्ट्र कोठे नेऊन ठेवलापासून ते अनेक विषयांवर उद्धव ठाकरे बोलतील. त्यामुळे आम्हालाही त्यांच्या भाषणाची उत्सुकता लागली आहे, असं खासदार अरविंद सावंत यांनी सांगितलं.
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गुवाहाटी दौऱ्यावरही टीका केली. महाराष्ट्राची संस्कृती श्रद्धास्थाने जपण्याची आहे. मात्र राज्यकर्त्यांनी श्रध्देचा बाजर मांडायला नको. महाराष्ट्र आणि शिवाजी महाराजांचा अपमान करणारी लोक आज राज्यात सरकार चालवत आहे, अशी टीका सावंत यांनी केली.