सातारा : कोकणानंतर पुराने पश्चिम महाराष्ट्रात हाहाकार माजवलाय. साताऱ्यासह अनेक कोल्हापूर, सांगली भागात पुराचं पाणी घरात घुसून अनेक लोक बेघर झालेत. अनेक लोक पाण्यात फसलेत. त्यांना युद्धपातळीवर वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातच आता सातारा जिल्ह्यात संगम माहुली येथे कृष्णा नदीला आलेल्या पुराचं पाणी थेट कैलास स्मशानभूमीमध्ये शिरलं आहे. त्यामुळे अंत्यसंस्कार होत असलेले निम्मी अर्धी जळालेले मृतदेह पाहून कर्मचाऱ्यांची मोठी धांदल उडाली.
साताऱ्यातील संगम माहुली येथे अचानक स्मशानभूमीत पाणी आल्यानं नुकताच अंत्यसंस्कार केलेल्या मृतदेहांपर्यंत पाणी पाहचलं. त्यामुळे निम्मे अर्धे जळालेले मृतदेह पाहून येथील कर्मचाऱ्याची धांदल उडाली. पुराच्या पाण्यानं जळणारे मृतदेह विझण्याची शक्यता आहे. मात्र, व्यवस्थापन या मृतदेहांवरील अंत्यसंस्कार पूर्ण व्हावेत यासाठी प्रयत्न करत आहे. असं असलं तरी पाऊस मोठ्या प्रमाणात असल्याकारणाने त्यांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागत आहे.
VIDEO: साताऱ्यात कृष्णेचं पाणी थेट स्मशानभूमीत, मृतदेह निम्मी अर्धी जळालेल्या स्थितीत पाहून कर्मचाऱ्यांची धांदल#Flood #Satara #HeavyRain #KrishnaRiver #SangamMahuli pic.twitter.com/idFZ4uzvL7
— Pravin Sindhu | प्रविण सिंधू ??✊ (@PravinSindhu) July 23, 2021
साताऱ्यातील आंबेघर गावात दरड कोसळली आहे. या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला असून पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केलं आहे. मोरणा विभागात असणाऱ्या आंबेघर येथे दरड कोसळण्याची घटना घडली आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून आंबेघर येथील काही घरे या मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली आहेत. या घटनेची माहिती समजताच काही ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले आहेत. मात्र त्याठिकाणी तीन कुटुंबातील लोक रात्रीपासून बेपत्ता असल्याचे सद्यस्थितीत समोर येत आहे.
गेल्या चार दिवसांपासून साताऱ्यात मोठा पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूर आला आहे. यापूर्वी कधीच असा पाऊस कोसळला नव्हता आणि पूरही आला नव्हता, असं राज्याचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं. आतापर्यंत आंबेघर गावात 12 जणांचा दरड कोसळून मृत्यू झाला आहे. एकूण 15 घरे या दरडीखाली दबल्याची शक्यता आहे. रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेतली असून मदतकार्य सुरू असल्याचं देसाई यांनी सांगितलं.