मोहम्मद इरफान, Tv9 मराठी, गडचिरोली | 14 डिसेंबर 2023 : गडचिरोलीच्या कुरखेडा तालुक्यातील गोडलवाही जंगल परिसरात नक्षलवादी आणि गडचिरोली पोलिसांमध्ये दीड तास चकमक झाली. या चकमकीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोलीना पोलिसांना यश आलं आहे. गडचिरोली पोलिसांच्या C60 पथकाने ही कामगिरी केली आहे. या चकमकीत 15 पोलीस जवानांचा जीव घेणाऱ्या नक्षलवाद्याला पोलिसांनी यमसदनी पाठवलं आहे. या नक्षलवाद्याने 2019 मध्ये जांभुळखेडा येथे भूसुरुंग लावून स्पोट घडवून आणला होता. या हल्ल्यात तब्बल 15 पोलीस जवान शहीद झाले होते. हा हल्ला घडवून आणणाऱ्यांचा मास्टरमाईंड असलेला नक्षलवादी आज चकमकी ठार झालाय.
कसनसुर उप कमांडर दुर्गेश वट्टी असं या ठार झालेल्या नक्षलवाद्याचं नाव आहे. या दोन नक्षलवाद्यांकडून AK 47 आणि ASR रायफल जप्त करण्यात आली आहे. हे दोन्ही नक्षलवाद्यांसह त्यांचे सहकारी आणखी पोलिसांवर मोठा हल्ला करण्याचा कट जंगलात आखत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी पोलिसांना दिली होती. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी सर्च ऑपरेशन केलं. या दरम्यान गोडलवाहीपासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या मोहल्ला मानपुर छत्तीसगड सीमावर्ती भागात पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली.
पोलिसांना पोस्टे गोडलावही पासून १० किमी अंतरावर छत्तीसगडमधील मोहल्ला मानपूर जिल्ह्यातील बोधीटोला जवळ माओवाद्याची एक मोठी तुकडी पोलीस दलावर घातपात घडवून आणण्याच्या आणि निष्पाप आदिवासींना मारण्याच्या उद्देशाने तळ ठोकून असल्याची गोपनीय सूत्रांकडून खात्रीशीर माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारावर गडचिरोलीच्या C60 पोलीस पथकाकडून परिसरात तातडीने शोध मोहीम राबवली गेली. पोलीस परिसरात शोध घेत असताना नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार सुरु केला. पोलिसांनी नक्षलवाद्यांच्या गोळीबाराला जोरददार प्रत्युत्तर दिलं. पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात जवळपास एक तास गोळीबार सुरू होता.
पोलिसांनी त्यानंतर परिसरात झडती घेतली तेव्हा एक AK47 आणि एक SLR शस्त्रासह दोन पुरुष माओवाद्यांचे मृतदेह सापडले. त्यापैकी एकाची प्राथमिक ओळख म्हणजे कसनसूर दलमचा उप कमांडर दुर्गेश वट्टी, जो 2019 मध्ये जांभूळखेडा स्फोटाचा मुख्य सूत्रधार होता. पोलिसांकडून आता पुढील ऑपरेशन्स आणि परिसराचा शोध सुरू आहे.
हे ऑपरेशन गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलोपत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. नक्षलविरोधी पोलीस अभियानाचे तीन तुकड्या जंगल परिसरात अजूनही कोमिंग ऑपरेशन करीत आहेत. या घटनेने नक्षलवादी संघटनेला पुन्हा एकदा मोठा हादरा बसला आहे. मोठ्या नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलिसांना मोठं यश आलं आहे.