सोलापूर : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर नेहमीच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका करत असतात. पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन पडळकर टीका करत असतात. यावेळीही त्यांनी शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली. ही टीका करत असताना गोपीचंद पडळकर यांनी पवारांचा एकेरी उल्लेख करत अरे तुरेची भाषा केली. पवारांबाबत बोलताना पडळकर यांची पुन्हा जीभ घसरली आहे. शरद पवार यांना मस्ती आलीय, असं ते एकेरी उल्लेख करताना म्हणाले. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
आमदार गोपीचंद पडळकर यांची शरद पवारांवर पुन्हा एकदा एकेरी शब्दात टीका केली आहे. गेल्या वर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिवशी शरद पवारांनी मस्ती केली. यावर्षी पवार का नाही आलेय़ पवार चार वेळा मुख्यमंत्री होते. बारा वर्षे केंद्रात मंत्री होते. तेही आता होते. मागं कधी होते मला माहिती नाही, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली. ही टीका करताना पडळकर वारंवार पवार यांचा एकेरी उल्लेख करत होते.
गेल्या वर्षी त्यांना आपले चौन्डी (गाव ) काढून घ्यायचे होते. त्यामुळे तुमच्या परिवर्तनाचे केंद्र असणारे चौन्डी जागृत ठेवली पाहिजे, असं आवाहन पडळकर यांनी धनगर समाजाला केले. सोलापुरातील मंद्रूप येथील धनगर समाजाच्या बैठकीत ते बोलत होते. जेजुरी देवस्थानामध्ये अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा बसवला. जेजुरी संस्थान आणि पवारांचा काही संबंध नाही. जेजुरी संस्थान ही होळकरांची जहाँगिरदारी आहे, असं ते म्हणाले.
रोहित पवार हे जयंतीच्या दिवशी प्रसाद वाटत होते. पण धनगरांच्या घरी वर्षाला पाच बोकड कापतात तुला माहिती नाही का माकडा?, असं म्हणत पडळकर यांनी रोहित पवार यांचा माकड असा उल्लेख केला. तुम्ही आता आयुष्यभर प्रसाद वाटायच्या कामाला आहात, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच पडळकर यांनी ठाकरे गटाचे आमदार संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. महाविकास आघाडीला राज्याच्या लोकांचं काही घेणं देणं पडलेलं नाही. ते राज्यातल्या कुठल्याही प्रश्नावर बोलत नाहीत. राज्यातील सत्ता गेल्याने यांना वैफल्यग्रस्तता आली आहे. त्यामुळे हे रोज महाविकास आघाडीमध्येही एकमेकांवर टीका करतात. यामुळे लोकांनी या महाविकास आघाडीकडे बघायचं, ऐकायचं सुद्धा नाकारलेलं आहे. संजय राऊत काय बोलले? अजित पवार काय बोलले? काँग्रेसचे नेते काय बोलले? याकडे लोक जास्त सीरिअसली बघत नाही, असं ते म्हणाले होते.